दोन मुख्य आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ – पाच आरोपींना एमसीआर >< पोलीस कर्मचारी हत्या प्रकरण

0
978
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

       चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथील बंजारा तांडा परिसरात अवैध गावठी दारू उद्ध्वस्त करून परत निघत असतांना दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला होता. यामध्ये एका पोलीसाची हत्या झाली. या प्रकरणातील अटक आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना मंगळवारी (ता. ५) न्यायालयात हजर केले असता दोन मुख्य आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली असुन इतर ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथील बंजारा तांड्यावर अवैध गावठी दारूचे उत्पादन होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव कवडुजी जाधव (५५) यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शामराव जाधव यांनी शिपाई सतीश शरद मडावी (४१) यांना सोबत घेतले. त्यानंतर ते दोघे दारू अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेले. यावेळी अवैध दारू विक्रेत्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये मडावी यांचा जागीच मृत्यु झाला असुन जाधव जखमी झाले होते. या हत्याप्रकरणात पोलीसांनी एकुण सात आरोपींना अटक केली आहे. परंतु यामधील मुख्य आरोपी उमेश शालिकराम राठोड (३०) व अजय उर्फ राजा सकरू राठोड (२०) यांना अटक केली असुन त्यांच्यावर कलम ३०२,३०७,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपींना लपविण्यास व पळविण्यास मदत करणारे विष्णु रतनसिंग चव्हाण (३०), राजु वासुदेव राठोड (३५), बाला लक्षीराम जाधव (३५), दिनेश शालिकराम राठोड (३५) व सकरू लक्षीराम राठोड (४०) यांच्यावर कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यांना ही अटक करण्यात आली होती. त्यांना ५ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सातही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले असता मुख्य आरोपी उमेश राठोड व अजय राठोड यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर आरोपींना लपविण्यास व पळविण्यास मदत करणाऱ्या ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ५ आरोपींची अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी चार आरोपी फरार असून पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.