वर्ष 2019 च्या निवडणुकीत ‘जो हिन्दू राष्ट्र का कार्य करेगा, वही देश पे राज करेगा’! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

0
873
रामनाथी (गोवा) – वर्ष 2019 च्या निवडणुका निकट आल्या आहेत. या वेळी हिंदुत्ववाद्यांची भूमिका काय असणार, पुन्हा भाजपच्या हाती सत्ता सोपवणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे; मात्र निवडणुकांतून लोकशाहीच्या केवळ एका राजकीय व्यवस्थेत पालट होतो, उर्वरित सर्व व्यवस्था ‘सेक्युलर’च रहातात. परिणामी देशात आज हिंदु बहुसंख्यांकांना दुर्लक्षित करून एकगठ्ठा असणार्‍या अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणावर आधारित राजकारण चालू आहे, त्यामुळे कोणत्याही सरकारला अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केल्याशिवाय पर्याय रहात नाही. याकरिता बहुसंख्य हिंदूंनी आतापासून संघटित होऊन हिंदूंच्या दबावाचे, नियंत्रणाचे राजकारण करणे आवश्यक आहे. वर्ष 2014 च्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांचा हिंदूंना गृहीत धरणार्‍या भाजप सरकारला विसर पडला आहे; म्हणून हिंदुत्ववाद्यांनी आतापासूनच आपल्या मागण्या निश्‍चित करून त्या राजकीय पक्षांच्या समोर ठेवल्या पाहिजेत. त्या कधीपर्यंत पूर्ण करणार, हे विचारले पाहिजे. आज विकासाच्या नावे राजकारण चालू आहे; मात्र विकास हा हिंदुत्वाला पर्याय नसून, ‘हिंदुत्वासह विकास’ आम्हाला अपेक्षित आहे. आज हिंदुत्ववाद्यांची सत्ता असतांनाही अयोध्येतील भगवान श्रीरामाचे मंदिर, काश्मीरमधील हिंदूंचे पुनर्वसन ही स्वप्नेच राहिली असून खरा विकास सत्ता उपभोगणार्‍यांचा चालू आहे. यासाठीच आता हिंदुत्ववादी पक्षांनी त्यांची हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंचे खरे हितरक्षण हिंदु राष्ट्र प्रस्थापित करूनच होईल. त्यामुळे आगामी काळात होणार्‍या निवडणुकांमध्ये जो ‘हिन्दू राष्ट्र का कार्य करेगा, वही देश पर राज करेगा’, ही हिंदुत्वनिष्ठांची मागणी असणार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते रामनाथी, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहामध्ये आयोजिलेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये तिसर्‍या दिवशीच्या सत्रात ‘वर्ष 2019 मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांची भूमिका’ या विषयावर बोलत होते.
या वेळी ‘हिंदु फ्रन्ट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर जैन, नेपाळमधील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पवित्र खडका आदी उपस्थित होते. आज सत्राच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. माधव भट्टराई यांचा, तर झारखंड येथील समितीचे पू. प्रदीप खेमका यांनी अधिवक्ता हरि शंकर जैन यांचा विशेष सन्मान केला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी भाषेतील सनातनच्या ‘स्वभावदोष (षड्रिपू) निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.