विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे भवितव्य धोक्यात ! – चांदूर रेल्वे – धामणगांव मतदार संघात नाराजीचा सुर

0
734
Google search engine
Google search engine
मतदारांची नाराजी व एमएलसीमधील दगाबाजी भोवणार
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
      चांदूर रेल्वे – धामणगाव मतदार संघात चांदूर रेल्वे, धामणगांव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. विधानसभेची निवडणुक ही चांदूर रेल्वे – धामणगांव मतदार संघासाठी अत्यंत महत्वाची निवडणुक आहे. गेल्या तीन टर्मपासुन या मतदार संघात कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. परंतु यंदा काही चित्रे पालटण्याची शक्यता दिसत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षासोबत दगाबाजी केल्यामुळे कॉंग्रेस विरोधात मतदार संघातुन नाराजीचा सुर ऐकावयास मिळत आहे. तसेच एकच एक उमेदवार कॉंग्रेसने यावेळीही दिल्यास कॉंग्रेसचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
        विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. यामुळे विविध पक्षांचे नेते अातापासुन कामाला लागले असुन गावागावांत भेटी घेणे सुरू झाले आहे. यावर्षीपासुन फ्लेक्सची सुध्दा भरमार सुरू झाली आहे. चांदूर रेल्वे – धामणगांव मतदार संघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जातो. परंतु यंदा या बालेकिल्ल्याला ग्रहण लागण्याची चिन्हे दिसत आहे. चांदूर रेल्वे येथील नगर परिषद कॉंग्रेसच्या ताब्यात असली तरी ते शहरवासीयांच्या सेवेत खरे उतरले नसल्याचे समजते. एकिकडे शहर अंधारात असतांना तसेच शहरवासीयांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाणीपुरवठा होत असतांना मात्र दुसरीकडे नगरसेवक प्रशिक्षणाच्या नावाखाली मौज-मस्तीसाठी जम्मु-काश्मीरमध्ये फिरायला गेल्याची चर्चा आहे. याचा लाखोंचा खर्च मात्र शहरवासीयांना सोसावा लागणार आहे. यामुळे शहरवासीयांत कॉंग्रेसप्रती चिड निर्माण झाली आहे. पथदिवे बंद असतांना मात्र कॉंग्रेसच्या नेत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. दिवसेंदिवस बेरोजगारांसाठी संख्या वाढत असतांना सुध्दा एकही लहाण- मोठा उद्योग चांदूर रेल्वे तालुक्यात गेल्या १४ वर्षांत आणण्यात स्थानिक लोकप्रतिनीधी अपयशी ठरले आहे. अशातच शहरवासीयांची महत्वाची मागणी असलेल्या रेल्वे थांब्यासाठी सुध्दा लोकप्रतिनीधीने कोणतेही ठोस पाऊले उचललेली नव्हती. शहरवासीयांच्या जिद्दीने शेवटी थांबा मिळवून घेतला. अशा अनेक कारणांमुळे चांदूर रेल्वे शहरातुनच प्रथम मतदारांत तिव्र असंतोष खदखदत आहे. यानंतर नांदगाव खंडेश्वर येथील नगर पंचायत मधून सुध्दा सत्तेतुन बाहेर पडणे कॉंग्रेसला भाग पडले. येथे सुध्दा कामे होत नसल्यामुळे कॉंग्रेसला धडा शिकविल्याचे समजते. त्याचप्रमाणे धामणगाव रेल्वे येथील नगर परीषदमधून ३ नगरसेवकांच्या संख्येवरून यावेळेस कॉंग्रेसची संख्या शून्य झाली आहे. तसेच पंचायत समितीत सुध्दा भाजपानेच बाजी मारली आहे. कॉंग्रेसचे केवळ जिल्हा परिषद सदस्य धामणगांव तालुक्यात आहे.
        म्हणजेच बालेकिल्ला असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यात कॉंग्रेस विरोधात सूर आहे. तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व नसून तेथे कॉंग्रेस, भाजपा व ढेपे गटाचे वर्चस्व आहे. तर धामणगांव रेल्वे तालुका भाजपाचा बालेकिल्ला असुन अजुनही त्यांचे वर्चस्व आहे. म्हणजेच एकुण पाहलं तर कॉंग्रेसच्या लोकप्रतिनीधीला यंदा विरोधच असल्याचे दिसत आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुध्दा अख्खी कॉंग्रेस विकल्या गेली असुन यामध्ये चांदूर रेल्वे – धामणगांव मतदार संघातील नेत्याने विरोधी उमेदवारासोबत मोठे अर्थकारण केल्याची चर्चा धडाक्यात सुरू आहे. तसेच मतदारांनासुध्दा पॅकेज मिळाल्याचे समजते. यामध्ये कॉंग्रेसच्या केवळ सौ. राधिकाताई प्रविण घुईखेडकर ह्या मतदार अपवाद ठरल्या आहे. कारण त्या ऐकट्याच कॉंग्रेसच्या एमएलसीच्या सभेला उपस्थित होत्या. या सर्वांवरून कॉंग्रेसच्या लोकप्रतिनीधीमुळे सद्यातरी कॉंग्रेसचे भवितव्य धोक्यात आले आहे. पक्षश्रेष्ठींकडून निवडणुकीपुर्वी मतदारांचा कौल लक्षात घेऊन योग्य उमेदवार दिल्यास कॉंग्रेसचे पुन्हा वर्चस्व या मतदार संघात राहील  अन्यथा कॉंग्रेसमध्ये यावेळेस एका विशिष्ट गटाकडुन बंडखोरी नक्कीच पहावयास मिळणार आहे.