पांडूरंग फुंडकर यांच्या निधनाने भाजपाचे मोठे नुकसान – ना. पंकजाताई मुंडे 

0
1180

मुंबईतील सर्वपक्षीय शोकसभेत कौटूंबिक स्नेहाच्या जागवल्या आठवणी

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

मुंबई दि. ०७ -कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर हे पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते होते, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पक्ष संघटनेचा विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावली, त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ मार्गदर्शन हरपला असून भाजपचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी फुंडकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. मुंडे-फुंडकर यांच्यातील कौटूंबिक स्नेहाच्या आठवणी त्यांनी यावेळी जाग्या केल्या.

फुंडकर यांच्या निधनाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री विनोद तावडे, गिरीष बापट, दिवाकर रावते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आकाश फुंडकर, बाळा नांदगावकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

स्व. पांडूरंग फुंडकर हे ‘भाऊसाहेब’ या नांवाने सर्वपरिचित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतांना पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेले काम उल्लेखनीय होते.
फुंडकर व मुंडे कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध होते, लोकनेते मुंडे साहेबांच्या निधनानंतर पहिल्यांदा जर अश्रू आले असतील ते फुंडकर काका गेल्यानंतर आले. मुंडे साहेब बुलढाणा दौऱ्यावर असतांना भाऊसाहेबांच्या घरीच मुक्काम करायचे म्हणून त्यांच्या आग्रहावरून नुकताच बुलढाणा आणि खामगाव दौरा केला. त्यादिवशी  भाऊसाहेबांच्या घरीच मुक्काम केला. रात्री दोन वाजे पर्यंत फुंडकर काका आणि काकू यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या, त्यात साहेबांच्या गोष्टी खूप होत्या, मुंडे साहेब ज्या खुर्चीवर बसायचे त्या खुर्चीवर भाऊसाहेबांनी आग्रहाने बसवले व लोकांच्या भेटी घडवून आणल्या असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. त्यांच्या जाण्याने सर्व पुर्ववत होईल पण घरच्या उंबरठ्यातील पोकळी व मनातील पोकळी कोण भरून काढेल कारण स्वतःला हे दुःख माहित आहे असे त्या म्हणाल्या.  मुंडे साहेब, फुंडकर काका हे भाजपच्या पहिल्या फळीतील नेते गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाले आहे. आ. आकाश फुंडकर, सागर यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहील असे सांगून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.