ठाणेदार श्री गजानन शेळके यांची सह्रदयता – 85 वर्षाच्या आजींना मिळवुन दिला हक्काचा निवारा

623

आकोट- संतोष विणके :-

पोलिसांनी संवेदनशीलता दाखविली की समाजाला कशी सकारात्मक मदत होऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी समाजा पुढे ठेवले आहे, त्यांनी एका 85 वर्षीय निराधार वृद्ध आजीची जगण्याची परवड थांबवत या आजीला हक्काचा निवारा मिळवुन दिला.अधीक महीन्यातील त्यांच्या या पुण्यकर्माचं सर्वसामान्यांनी जोरदार स्वागत केलं आहे.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वतःचेच जीवन जगणे कठीण झाले आहे.यातच मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार वाढले आहेत. अश्यात स्वतः चे मूल नसलेल्या वृद्धांचे जगणे तर फारच जिकरीचे झाले आहे अकोट शहरातील गोकर्णाबाई विश्वनाथ आमले ह्या 85 वर्षाच्या वृद्ध महिलेचे पती 30 वर्षांपूर्वी मरण पावले त्यांना एक मुलगी होती तिचे वरुड जिल्हा अमरावती येथील मालखेड येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात लग्न करून दिल्या नंतर स्वतः ची 3 एकर शेती कसून कशीतरी गुजराण करीत होती परंतु वृद्ध पण आल्या नंतर शेती करणे शक्य होत नसल्याने त्यांनी त्यांचे भावाची मुले अकोट येथीलच गणेश असरकर व सुरेश असरकर ह्यांचे कडे आसरा घेतला, म्हातारीची 3 एकर शेती कसून त्या बदल्यात ते म्हतारी चे पालन पोषण करीत माञ त्यांची सुद्धा परिस्थिती गरिबीचीच असल्याने व शेती पिकत नसल्याने दोघांच्याही पत्नीने गोकर्णाबाईचे पालन पोषण करण्यास साफ नकार दिला त्यामुळे मागील 3 वर्षा पासून त्यांचे हाल सुरू झाले, त्या तुनच वाढत्या वयोमानानुसार आजार पण सुद्धा सुरू झाले तेव्हा काही दिवस वेगवेगळ्या नातेवाईका कडे राहून कसे बसे दिवस काढीत असतांना, मागील 3 महिन्या पासून नातेवाईकांनी सुद्धा तिचे पालन पोषण करण्यास असमर्थता व्यक्त केली होती.

तेव्हा या आजीबाईला पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहरातील एकटे राहत असलेले निराधार वृद्धांची मदत करतात अशी माहिती मिळल्यावरून त्यांनी शेळके ह्यांची भेट घेतली व आपली करून कहाणी त्यांना सांगितली ते ऐकून संवेदनशील मनाच्या पोलिस निरीक्षक शेळके ह्यांनी आजीबाईला तिची काळजी घेण्याचे आश्वासन देऊन तिच्या जवळच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावून समजावून सांगून आजीबाईची काळजी घेण्यास सांगून आजीबाईला आर्थिक मदत सुद्धा केली. गोकर्णाबाई जेव्हा गरज लागली तेव्हा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना भेटून आपली गरज भागवित होत्या, परंतु मागील 15 दिवसापासून आजी बाईला परत नातेवाईकांनी दूर लोटल्या मुळे व त्यांना जवळचे असे कोणीही नसल्याने त्या मंदिरात राहून व वेळ प्रसंगी वेगवेगळ्या नातेवाइकांच्या घरी जाऊन तर कधी बाहेर जेवून कशीबशी आपली गुजराण करीत होत्या, त्यांनी ही बाब परत पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना सांगितल्यावर आजीबाई ला कायमचा आधार मिळावा म्हणून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने आजीला साडी चोळी करून आर्थिक मदत केली.शिवाय वलगाव जिल्हा अमरावती येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम येथे आजीची व्यवस्था करून आज दिनांक 9।6।18 रोजी खाजगी वाहनाने सामाजिक कार्यकर्ते सोबत पाठवून पोलिस स्टेशन मधून रवाना केले.ठाणेदारांच्या या सह्रदयतेने आजीचे डोळे पाणावले होते. ठाणेदार शेळके यांच्या या संवेदनशिलतेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.असे असले तरी एकीकडे ठाणेदार शेळके हे पोलीसांची स्वच्छ प्रतिमा जपण्याचा जीवतोड प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे काही अधीकारी ,कर्मचारी त्याला सुरुंग लावण्यात कुठलीही कसर सोडतांना दिसत नाही आहेत.त्यामुळं आकोट शहरातील नागरीक पोलीसांची दोन्ही रुप जवळुन न्याहाळतांना दिसत आहेत..

जाहिरात