पीक विमा किंवा नुकसान भरपाईचे पैसे कर्जापोटी कापू नका – जिल्हाधिकारी अभिजित बांगर

0
1126
Google search engine
Google search engine

लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन हा गुन्हा
पीक विम्याची, तूर खरेदीची रक्कम किंवा नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून कर्जाची रक्कम कपात करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश प्रशासनाकडून यापूर्वीच बँकांना देण्यात आले. तरीही ‘पीएनबी’कडून कपात झाल्याचे निदर्शनास आल्याने व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापुढे बँकांकडून असा प्रकार घडता कामा नये. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांना कर्ज मिळण्यासाठी पुरेपूर मदत केली पाहिजे, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.
जिल्ह्यात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करणे सुरु आहे. तूर खरेदीची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम आदी रकमाही जमा होत आहेत. अशा रकमांतून पीक कर्जाची किंवा कोणत्याही कर्जाची रक्कम कपात न करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे सर्व बँकांना तसे निदर्शनास आणून देण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आदेश देण्यात आले होते. तशी रक्कम कपात केल्याचे आढळल्यास बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट सूचित केले होते, असेही ते म्हणाले.
पीएनबीच्या अचलपूर शाखेकडून विमा रक्कम कपात
स्पष्ट निर्देशानंतरही पीक विम्याची पंजाब नॅशनल बँकेत जमा झालेली रक्कम कर्जापोटी कपात करण्यात आल्याची तक्रार अचलपूर तालुक्यातील बोरगाव दोरीचे रामदास जवंजाळ यांच्याकडून प्राप्त झाली. श्री. जवंजाळ यांनी 2016-17 चा पीक विमा काढला होता. त्याची रक्कम पीएनबीच्या अचलपूर शाखेत जमा झाली होती. ती बँकेकडून कपात करण्यात आली.

त्यामुळे श्री. जवंजाळ यांच्या तक्रारीनुसार बँकेच्या व्यवस्थापकाला ज्ञापन देऊन खुलासा मागविण्यात आला. मात्र बँकेच्या व्यवस्थापकांनी खुलासा सादर केला नाही. भा.दं.वि. कलम 188 अन्वये लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे व्यवस्थापकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश अचलपूर तहसीलदारांना देण्यात आले. त्यानुसार तहसील कार्यालयातर्फे अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटपाचे काम संथ गतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व आस्थापनांची या बँकेतील खाती बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ही सर्व खाती युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत