ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत चुकीची माहिती देणा-या शिक्षकांवर कारवाई – जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री

0
821
Google search engine
Google search engine

अमरावती :- ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत 28 शिक्षकांनी पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे तालुकास्तरीय तपासणी समितीच्या निदर्शनास आले आहे. या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.
शासन स्तरावरुन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार 2 हजार 941 शिक्षकांचे बदली व कार्यमुक्तीचे आदेश 28 मेस प्राप्त झाले. त्यानंतर शिक्षकांना बदलीचे ठिकाणी रुजू होण्यासाठी तालुकानिहाय गटशिक्षणाधिका-यांमार्फत कार्यवाही झाली. दरम्यान, विशेष संवर्ग भाग 1 मध्ये 534 व भाग 2 मध्ये 290 असे एकूण 824 प्रस्तावांची पडताळणी तालुका विशेष तपासणी समितीकडून झाली. या प्रस्तावांत एकूण 28 शिक्षकांनी पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे श्रीमती खत्री यांनी नमूद केले.
शिक्षकांना बदलीबाबत तक्रार असेल तर त्यांनी पुरावे व दस्तऐवजासह जि. प. शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे कार्यालयीन वेळेत तात्काळ सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.