लहान मुलांनी लोकवर्गनीतुन बसविले बस स्टँडवर बेंच – बग्गी येथील चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम

0
780
Google search engine
Google search engine
लोकप्रतिनीधी ठरले फुसके फटाके
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
     लहाण मुलं म्हणजे देवा घरचीे फुलं असे म्हटले जाते. मात्र त्यांच्या निरागस मनात एखादी गोष्ट आली की ते मोठ्या उत्साहाने पार पाडतात. संस्कार झाले तर चिमुकल्यांच्या हाताने चांगले कामे सुध्दा सहजतेने होतात. हे सिध्द केलंय चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील चिमुकल्यांनी.
     जे काम मोठी माणसे करू शकतात ते लहाण्यांकडून होत नाही असा समज जनमाणसात असतो. परंतु हा समज चुकीचा सुध्दा ठरू शकतो. कारण अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील चिमुकल्यांनी स्वत: लोकवर्गनी करून बस स्टँडवर बेंच बसविले आहे. मोठ्या माणसांना लाजविणारा असा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच लहान मुलांनी राबविला आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावांत उन्हाळ्यात राष्ट्रसंत चौकातील मानवता मंदिर येथे पाच दिवशीय बाल सुसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न झाले होते. या शिबीराचे प्रशिक्षक प्रकाश चवाळे यांनी योगासने, लाठीकाठी, संगीत, भाषणशैली, सामुदायिक प्रार्थना, श्लोक, भजन व रंगकाम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या शिबिरादरम्यान चिमुकल्यांनी सामाजिक उपक्रम हाती घेऊन लोकवर्गणीतून बसस्टॉपवर बसण्यासाठी बेंच लावण्याचे ठरविले होते. याकरिता चिमुकल्यांनी झोळी फिरवून गावातून लोकवर्गणी केली होती. याच वर्गणीच्या पैशातुन दोन बेंचेच घेऊन गावातील बस स्टँडवर बसविले आहे. यामुळे बसची वाट पाहत उभे असणाऱ्यांना या बेंचमुळे थोडा दिलासा मिळणार आहे. चिमुकल्यांच्या या उपक्रमामुळे त्यांच्यापुढे लोकप्रतिनीधी फुसके फटाके ठरले आहे. प्रवाशांना बसण्याकरीता बेंच नसल्याचे लहान मुलांच्या लक्षात आले, परंतु गावातील असलेल्या पंचायत समिती सभापती यांना सदर बाब लक्षात सुध्दा आली नसल्याचे दिसत आहे. या चिमुकल्यांच्या कोणत्याही उपक्रमामागे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चवाळे खंबीरपणे उभे राहतात.
       याच बेंचचा लोकार्पण सोहळा शनिवारी थाटात पार पडला. या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी अनिल देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ मोहोड, रामुजी गाईचारे, शरद गोळे, श्री. गाढवे  आदींची उपस्थीत होते.  याच कार्यक्रमात बग्गी गावातील युवक अश्विन अशोकजी गुल्हाणे हा आर्मीत गेल्याने त्याच्या वडिलाचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करून बेंचचे लोकार्पण सुध्दा त्यांच्याच हस्ते करण्यात आले. यासोबतच १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा  सत्कार लहान मुलांनी केला. या सोहळ्याचे संचालन पुजा गोळे व अंतरा चवाळे यांनी तर आभार प्रदर्शन दादाराव स्वर्गे यांनी मानले. राष्ट्रवंदना घेवून कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विजया चवाळे, नलिनी गोळे, प्रकाश चवाळे, शोभा हारगूडे, निता मस्के, विजय वासनिक यांसह गावकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बसची वाट पाहत माणसे कुठेही उभी राहू शकतात. परंतु मुली-महिला कुठेही उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही बेंच लावण्याचे ठरविले व गावात झोळी फिरवून प्रत्येकाकडून फुल नाही फुलाची पाखळी घेतल्याचे परणिका महाजन हिने सांगितले.
गावात सुसंस्कार शिबीर झाले होते. यामधून आम्ही गावातील समस्यासुध्दा मांडल्या होत्या. तसेच आमच्या लक्षात सुध्दा आले की, शाळेत जातेवेळी बसची वाट पाहतांना बस स्टँडवर बसण्यासाठी आम्हाला व प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसते. तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन लोकवर्गनीतुन बेंच बसविल्याचे मनोगत अंतरा चवाळे हिने व्यक्त केले.