पुसद येथे अवैध सावकारांवर धाड

0
2296

यवतमाळ : पुसद येथील दोन प्रकरणात अवैध सावकारांवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाने धाड टाकून कार्यवाही केली. एका प्रकरणात शेतजमीन तर दुसऱ्या प्रकरणात धनादेश व करारनामा परत करण्यास नकार देण्याऱ्या दोन सावकारांवर सदर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
पुसद तालुक्यातील घाटोडी येथील हरणाबाई बळी, बंडू बळी, रतन पोते व प्रल्हाद बळी यांनी शिवपार्क येथील सावकार बेबीबाई हनवता वाघमारे व हनवता वाघमारे यांच्याकडून 32 हजार रुपयांची उचल केली होती. त्यांना आड म्हणून घाटोडी येथील शेतकऱ्यांनी 1 हे. 21 आर शेतजमीनीचे पोकळ खरेदी खत करून दिले. यानंतर सावकार वाघमारे यांना शेतजमीन परत मागितली असता सन 2008 ते 31 मे 2015 पर्यंत एकूण जमीनीची किंमत 13 लक्ष 57 हजार 317 रुपये दिले तरच तुमची जमीन परत देऊ, असे वाघमारे यांनी सांगितले.

याबाबत सदर शेतकऱ्यांनी सावकाराचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पुसद कार्यालयात 25 मे 2018 रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 16 नुसार कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यवाहीत जिल्हा सावकारी नियंत्रण पथकाचे प्रमुख प्रेम राठोड, दारव्हा येथील सावकाराचे सहाय्यक निबंधक एम.आर.अंबिलपुरे, आर्णी येथील सावकाराचे सहाय्यक निबंधक एस.एस.पिंपरखेडे, सहकार अधिकारी डी.यु.खुरसडे, सहाय्यक सावकार अधिकारी आर.एस.नवरे, लेखापरिक्षक सहकारी संस्था पुसद तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेबीबाई वाघमारे व हनवता वाघमारे यांच्या घरी धाड टाकून अवैध सावकारी संबंधाने संक्षयास्पद कागदपत्रे व दस्ताऐवज ताब्यात घेतले.
अवैध सावकारीबाबत दुसऱ्या एका प्रकरणात पुसद येथील वंदना गंगाधर ढवळे यांनी श्रीरामपुर येथील अवैध सावकार सतीश सुर्यतळ यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली. वंदना ढवळे यांनी सतीश सुर्यतळ यांच्याकडून 10 टक्के व्याजदराने कर्ज म्हणून 50 हजार रुपयांची उचल केली होती. व त्याबदल्यात स्टेट बँक ऑफ इंडिया पुसद शाखेचा कोरा धनादेश आणि करारनामा सावकार सुर्यतळ यांच्याकडे दिला होता. वंदना ढवळे यांनी 20 हजार रुपयाप्रमाणे दोन महिन्याचे एकूण 40 हजार रुपये यांच्या खात्यात जमा केले होते. याबाबत त्यांनी कोरा धनादेश व करारनाम्याची मागणी केली असता ते परत देण्यास सावकार सुर्यतळ यांनी नकार दिला. याबाबत वंदना ढवळे यांनी लेखी तक्रार 24 मे 2018 रोजी पुसद येथील सावकाराचे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे दाखल केली. त्याअनुषंगाने महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 रोजी तरतुदीनुसार श्रीरामपुर येथील सतीश सुर्यतळ यांच्या राहते घरी आज धाडीची कार्यवाही करण्यात आली.
सदर कार्यवाही सावकाराचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथील सावकाराचे सहाय्यक निबंधक सुनिल भालेराव जी.एस.कदम, एम.आर.राठोड, आर.ए.रिठे इतर अधिकारी यांनी केली. या कार्यवाहीमध्ये पंच म्हणून शाखा सचिव एल.पी.डुड्डेवार, पी.एम.राठोड, जी.ए.तरासे व मनोहर जाधव उपस्थित होते. या कार्यवाहीकरीता पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.एस.पांडव, महिला पोलीस शिपाई भारती चव्हाण, पोलीस शिपाई तुकाराम जंगवाट, सुषमा राठोड आदींनी सहकार्य केले. सदर प्रकरणी चौकशी करून संबंधीतांवर पुढील कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, असे पुसद येथील सावकाराचे सहाय्यक निबंधक एस.एस.भालेराव यांनी सांगितले. तर अवैध सावकारी प्रकरणाबाबत जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.