विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणीच्या पालखीचे बियाणी चौकात जंगी स्वागत

0
1421
Google search engine
Google search engine

पंढरपूरला विशेष मान लाभलेल्या विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणीच्या पालखीचे बुधवारी सायंकाळी येथील बियाणी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसातही अमरावतीकरांनी मोठी गर्दी केली. ४२४ वर्षांची परंपरा व शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या या सोहळ्याचे आयोजन आ. यशोमती ठाकूर मित्र मंडळाने केले होते.

राज्यात सर्र्वाधिक प्राचीन व सन १५३४ पासून अविरत सुरू असलेल्या व पंढरपूर येथे देवी रुक्मिणीच्या माहेराची म्हणून विशेष मान असलेल्या या पालखीचे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून १७ जून रोजी पंढरपूर येथील आषाढी सोहळ्याकरिता प्रस्थान झाले. २७ जुलै रोजी पालखी पंढरीला पोहोचणार आहे. बुधवारी जि.प. सदस्य अभिजित बोके व प्रभाकर लव्हाळे यांच्या घरी पालखीची पूजा करण्यात आली. आगमनापूर्वी चौकात आ. यशोमती ठाकूर यांच्यासह उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडीचा फेर धरला. यावेळी पदाधिकाऱ्यानीही ‘हरी ओम विठ्ठला’ या भजनावर ताल धरला. बियाणी चौकात दिंडीचे आगमन होताच पावसाला सुरुवात झाली. तरीही टाळ-मृदंगाचा निनाद व ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषात जंगी स्वागत करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी याठिकाणी सपत्नीक पूजा व आरती केली, तर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय मंडलिक, उपविभागीय अधिकारी श्री विनोद शिरभाते, आ. यशोमती ठाकूर, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, यशोमतींच्या मातोश्री पुष्पलता आदींच्या उपस्थितीत पालखीची पूजा करण्यात आली.

पालखीच्या स्वागतासाठी शहरातील बियाणी चौकात चौकोनी रिंगण करण्यात आले होते. यामधील चौथºयावर पालखी ठेवण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी चौकासह मार्गावर भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. पालखीच्या स्वागताला आ. यशोमती ठाकूर आदींनी सामोरे जाऊन ती खांद्यावर घेऊन चौकात आणली. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीचा जयघोष करण्यात आला व पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, विलास इंगोले, बबलू शेखावत, जयंतराव देशमुख, प्रफुल्ल देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, हरिभाऊ मोहोड, प्रल्हाद चव्हाण, मुकुंदराव देशमुख, दिलीप काळबांडे, सुरेखा लुंगारे, अलका देशमुख, हरीश मोरे, वैभव वानखडे, शीतल मेटकर, विनोद गुडधे, जितेंद्र ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त अतुल ठाकरे, सदानंद साधू, नामदेवराव अमाळकर आदी उपस्थित होते.