जनता दल (से.) ची विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू – जिल्हाध्यक्षाची निवड होताच कार्यकर्ते लागले कामाला

0
1135
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
     जनता दल (से.) च्या जिल्हाध्यक्षपदाची माळ नुकतीच गौरव सव्वालाखे यांच्या गळ्यात पडली. जिल्हाध्यक्षपदाची निवड होताच जनता दल (से.) चे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात जनता दलाने उडी घेतल्यास निवडणुक चुरसीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
      कर्नाटकमध्ये जनता दल (से.) चे मुख्यमंत्री विराजमान होताच जनता दलाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उर्जा पहावयास मिळाली. कर्नाटकातील निवडणुकीनंतर संपुर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची जनता दलाची बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली. यामध्ये कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यात आले. यासोबतच अमरावती जिल्हाध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरव सव्वालाखे यांची वर्णी लागली. जिल्हाध्यक्षपदाची निवड पार पडताच कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असुन चांदूर रेल्वे – धामणगांव मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे समजते. माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांनी जनता दल पक्षाची मुहुर्तमेढ चांदूर रेल्वे – धामणगाव मतदार संघात सर्वप्रथम रोवली. जनता दलाच्या तिकीटीवर ते एका वेळा आमदार म्हणुन सुध्दा निवडुन आले. या मतदार संघात शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर आंदोलन, मोर्चे काढून त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्याचे मुख्य काम स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांनी जनता दलाच्या माध्यमातुन केले. परंतु १४ महिण्यांपुर्वी त्यांच्यावर काळाने झडप घातल्यामुळे जनता दल पक्ष अमरावती जिल्ह्यातुन पोरका झाला होता. परंतु तरीही कार्यकर्ते मागे न हटता स्व.डॉ. ढोले यांच्याप्रमाणे शेतकरी, शेतमजुर यांच्या प्रश्नावर वाचा फोडत आहे. आता गौरव सव्वालाखे यांच्या नेतृत्वात जनता दल (से.) कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांचे अनेक स्वप्न अपुर्ण राहिले असून ते पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असुन जबाबदारीच्या माध्यमातुन जनता दल पक्षाचे ध्येय, धोरण, भुमिका व कार्य सर्व वर्गात पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे गौरव सव्वालाखे यांनी सांगितले आहे. स्व. ढोले यांनी केलेल्या कार्यामुळे जनता दलाच्या मतदारांचा गठ्ठा अजुनही मतदार संघात कायम आहे. गौरव सव्वालाखे यांचे वडिल स्व. सुधाकरराव सव्वालाखे सुध्दा चांदूर रेल्वे मतदार संघातुन आमदार म्हणुन निवडुन आले होते. त्यामुळे वडिलांपासुनचे अजुनही अनेकांसोबत असलेले संबंध तसेच स्व. ढोले यांचा चाहतावर्ग या सर्वांना भेटुन त्यांना आपल्या पक्षाकडे खेचण्याचा तसेच पहिलेपासुनच्या मतदारांना कायम ठेवण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत आहे.
        येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दल पक्षाने मैदानात उडी घेतल्यास राजकीय समिकरण नक्कीच बदलण्याची चिन्हे आहे. परंतु जनता दल महाराष्ट्रात स्वतंत्र लढणार की कर्नाटकच्या धर्तीवर युती करणार ? हे येणारा काळच सांगले. मात्र कर्नाटकच्या धर्तीवर युती झाल्यास जनता दलातर्फे चांदूर रेल्वे – धामणगांव मतदारसंघातुन आपली दावेदारी नक्कीच ठोकणार आहे. कारण या मतदार संघात जिल्हात सर्वांत सक्रीय कार्यकर्ते अजुन विशिष्ट मतदारांचा गठ्ठा सुध्दा आहे. असे असतांनाही सद्या मात्र चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात कार्यकर्त्यांनी भेटीचा सपाटा सुरू केला आहे.