भुमिगत वीज वाहिनीच्या कामामुळे खोदलेले रस्ते 30 जूनपर्यंत दुरुस्त करण्याचे भाजपा शिष्टमंडळाला महावितरणचे आश्‍वासन

0
728
Google search engine
Google search engine

अमरावती :-

शहराच्या विविध भागात गेल्या काही दिवसापासून वीज वाहीन्या भुमिगत करण्याचे काम सुरू असून ज्या ठिकाणी रस्ते खोदले आहे ते रस्ते दुरुस्तीचे काम येत्या 30 जूनपर्यंत पुर्ण करण्याचे ठोस आश्‍वासन महावितरण व संबधित कंत्राटदाराने सोमवार 25 जून रोजी भाजप नेते तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळाला दिले.

वाहीन्या भुमिगत करण्याचे काम काही ठिकाणी अतिशय संथगतीने होत आहे. साईनगर व अन्य काही भागांमध्ये रस्ते फोडून हे काम करायचे आहे. कंत्राटदाराने रस्ता फोडला पण कामच पुर्ण केले नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. किरकोळ अपघाताच्या घटनाही येथे घडल्या आहे. खोदल्याने माती रस्त्यावरच आहे. पावसाच्या पाण्यामुळे तेथे चिखल होत आहे. या सर्व समस्यांची दखल घेऊन भाजपा नेते व नगरसेवक तुषार भारतीय यांच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळाने सोमवार 25 जून रोजी अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) अनिल वाकोडे यांची गर्ल्स हायस्कूल चौकाजवळच्या वीज कंपनीच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी संबधित कंत्राटदार प्रामुख्याने उपस्थित होता. वीज वाहीन्या भुमिगत करण्याचे काम सुरू असताना निर्माण झालेल्या अडचणी व कामाच्या पद्धतीवर सविस्तर चर्चा झाली. पुढे पावसाचे दिवस असल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात त्याकडेही तुषार भारतीय यांनी लक्ष वेधले आणि तातडीने काम पुर्ण करण्याची मागणी केली. सखोल चर्चेनंतर संबधित कंत्राटदाराने येत्या 30 जूनपर्यंत खोदलेल्या रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे ठोस आश्‍वासन अभियंता वाकोडे यांच्या उपस्थितीत दिले. यावेळी नगरसेवक चेतन गांवडे, प्रवीण कौंडण्य, मंगेश खोंडे, दिनकर चौधरी, जयंत जोशी उपस्थित होते.