पळसखेडच्या पीएचसीतील डॉक्टरांना मागितला खुलासा – जि. प. अध्यक्षांच्या गावातील पीएचसीमधील अनुपस्थीत डॉक्टरांचे प्रकरण

0
768
Google search engine
Google search engine
गावकऱ्यांनी ठोकले होते कुलुप
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पळसखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर नसल्याने गावातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकतेच कुलूप ठोकल्याचे प्रकरण समोर आले होते. जि.प. अध्यक्षांच्याच गावाच्या आरोग्य केंद्राची ही अवस्था असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गावकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांनी संबंधित डॉक्टरला जाब विचारत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
     चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड गावातील एका युवकाने काही दिवसांपुर्वी गावालगत असलेल्या एका विहिरीत उडी घेतली होती. घटनेची माहिती होताच काही ग्रामस्थांनी त्या युवकाला बाहेर काढले होते. त्यानंतर उपचारासाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेव्हा आरोग्य केंद्रात कोणीच हजर नव्हते. काही वेळानंतर एक आरोग्य परिचारिका आल्या व जमेल त्या पद्धतीने त्यांनी उपचार केला होता. मात्र त्या ठिकाणी निवासी डॉक्टर नसल्याने योग्य उपचार होऊ शकला नाही. रुग्णाची परिस्थिती पाहता त्याला १०८ क्रमांकाची रूग्णवाहीका बोलावून चांदुर रेल्वे येथे पाठविण्यात आले. मात्र नंतर डॉक्टर नसल्याने गावातील लोकामध्ये रोष निर्माण झाला होता. संतापलेल्या गावकऱ्यांनी त्यादिवशी रात्री माजी सरपंच संजय पुनसे यांच्या नेतृत्वात प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्री कुलुप ठोकले होते. यांनतर दोषी डॉक्टरांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे गेट उघडले होते. याच आंदोलनाची दखल घेत दोन्ही अनुपस्थित डॉक्टरांना खुलासा मागितला असून त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती डॉ. सुरेश असोले यांनी दिली. एकाच वेळी आरोग्य केंद्रात निवासी व सहायक डॉक्टर दोघेही कसे अनुपस्थित होते?  त्या ठिकाणी एका डॉक्टरला थांबणे गरजेचे होते. त्यामुळे यासंदर्भात जबाबदार असलेल्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना खुलासा मागविण्यात आला. यापुढे डॉक्टर उपस्थित राहील याची खबरदारी खबरदारी घेतली जाईल अशी माहिती सुध्दा डॉ. असोले यांनी दिली. त्यामुळे संबंधित डॉक्टरवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.