चांदूर रेल्वे तालुक्याचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर – वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पदे रिक्त, जनतेची कामे खोळंबली

0
1083
नियमित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लोकप्रतिनीधींच्या पुढाकाराची गरज
 चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
 नियमित कामे, पारदर्शी प्रशासन असे घोषवाक्य शासनाचे आहे. परंतु या घोषवाक्याचा फज्जा चांदूर रेल्वे शहरात उडाल्याचे चित्र दिसत आहे. कारण तालुक्यातील मुख्य कार्यालयातील पदे रिक्त आहे. त्यामुळे कारभार प्रभारींच्या खांद्यावर असून तालुकावासीयांची अनेक कामे खोळंबली असल्याचे दिसत आहे.

 चांदूर रेल्वे तालुक्याचे ठिकाण असुन येथे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी हे मुख्य कार्यालय आहे. महत्वपूर्ण कार्यालयाच्या प्रमुखांचे पद मागील अनेक महिन्यापासून येथे रिक्त आहेत. यामध्ये विशेष म्हणजे शहरातील सर्वात महत्वाचे पद उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी हेच प्रभारी आहे. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हांमध्ये भरमसाठ वाढ झाल्यानंतरही नियमीत एसडीपीओ रूजु झालेले नाही. यासोबत तहसिलदार यांचे पदसुध्दा गेल्या ३ महिण्यांपासुन प्रभारी असुन नायब तहसिलदार या पदाचा कारभार पाहत आहे. तहसिलदार राजगडकर हे सुटीवर जाण्यापुर्वी त्यांनी दबंग कारवाई करत अवैध उत्खनन करणाऱ्या के. के. विद्युत कंपनी, अहमदनगर ला तब्बल ८० लाखांचा दंड ठोठावला होता. परंतु त्यानंतर सुटीवर गेल्यानंतर त्यांनी पदभार अजुनही स्विकारलेला नाही. शिक्षण विभागाचे तालुक्यातील महत्वाचे असलेले पद गटशिक्षणाधिकारी गेल्या ३ वर्षांपासुन रीक्त अजुन सदर पदावर प्रभारी अधिकारी आहे. सोबतच विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शालेय पोषण आहार अधीक्षक असे अनेक महत्वाची पदे शिक्षण विभागाची प्रभारावर आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जेकडे वाटचाल करणारी  शहरातील जिल्हा परीषद हायस्कूलचे मुख्याध्यापक पद ही गटशिक्षणाधिकारी यांचेकडे प्रभारीच आहे. म्हणजे पहिलेच प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यावर पुन्हा एका महत्वाच्या पदाचा प्रभार दिल्याने तालुक्यातील शिक्षण विभाग पूर्णता प्रभारी आहे. त्यामुळे शिक्षण विभाग शिक्षणाच्या बाबतीत किती जागृत आहे हे यावरून दिसत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिमहत्वाचा असणारा कृषी विभाग सुध्दा या प्रभारी पदापासुन सुटलेला नाही. मुख्य कृषी अधिकाऱ्याचेच पद प्रभारी असल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे थांबलेली आहे. पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांचे श्रेणी १ च्या पदावर श्रेणी २ च्या अधिकाऱ्यांची नेमनुक करण्यात आली आहे. त्यामुळे श्रेणी १ च्या पदावर श्रेणी २ चे अधिकारी तब्बल ८ महिण्यांपासून असा प्रभार सांभाळात आहे.

       त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील महत्वाची उपविभागीय अधिकारी,  उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, गटविकास अधिकारी असे अनेक पदे अनेक महिन्यांपासुन रिक्त असून त्यांचा कारभार प्रभारावर सुरु असल्याने तालुक्यातील कामे खोळंबली आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देणे महत्वाचे झाले आहे.

लोकप्रतिनीधींनी लक्ष देण्याची गरज

    शासकीय कार्यालयातील मुख्य पदावर काम करीत असतांना नियमित अधिकाऱ्यांची अनेकवेळा तारांबळ उडते तर प्रभारी अधिकारी कसे कामे करीत असतील, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे शहरातील कार्यालयात नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती महत्वाची असुन यासाठी लोकप्रतिनीधींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.