काटेपूर्णा अभयारण्यात वृक्षारोपण, सीडबॉल  निमिर्ती व रोपण;१३ कोटी वृक्षलागवडीचा शुभारंभ

598

अकोला-पाणी देणारे जंगल म्हणून ओळखले जाणारे काटेपूर्णा अभयारण्याच्या संवर्धनासाठी लोकसहभाग वाढावा याकरीता अकोला वन्यजीव विभाग व निसर्गप्रेमी संस्थाच्या संयुक्त विद्यमाने काल दि.१जुलै ला काटेपूर्णा अभयारण्यातील निसर्ग माहीती केंद्रात वृक्षारोपण, सीडबॉल रोपण व सीड बॉल निमिर्ती करून १३ कोटी वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना, अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय अधिकारी श्री. मनोजकुमार खैरनार म्हणाले की, वन व वन्यजीव संवर्धनासाठी लोक सहभाग अत्यंत महत्वपूर्ण आहे. जो माणूस पाण्याचा उपभोग घेतो त्याने वृक्ष, वन व वन्यजीव संवर्धन कार्यासाठी हातभार लावलाच पाहीजे, कारण या तिन्ही घटकांमुळे माणसाला शुद्ध हवा व पाणी मिळत आहे. या वेळेस सहा. उपवनसंरक्षक श्री. गाढे, वत्सगुल्म संस्था, वाशिम चे श्री. मिलिंद सावदेकर, खंडेलवाल महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद शिरभाते व निसर्गकट्टाचे श्री. अमोल सावंत उपस्थित होते. अमोल सावंत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यानंतर उपस्थित निसर्ग प्रेमीं च्या मदतीने जवळपास १५०० बांबू, अमलतास व बेलाच्या सिड बॉलचे रोपण करण्यात आले व त्यानंतर सर्वांनी मिळून बांबू सिडबॉलची निर्मीती केली तसेच येडशी बिट येथे स्थानिक लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आले.
हा कार्यक्रमात निसर्गकट्टा व वत्सगुल्म संस्था वाशिमचे सदस्य सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पवार, वनपाल श्री. चाऊजी, श्री. घुटके, वनरक्षक श्री. सोनवणे तसेच निसर्गकट्टाचे श्री. राहुल ओईंबे, श्री. प्रदिप किडीले, शिवा इंगळे, सुरज घोगरे व अभय साखरकर यांनी अथक परीश्रम घेतले.