तिवरावासी धडकले चांदूर रेल्वे विद्युत वितरण कार्यालयावर – एका महिण्यापासुन सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे गावकरी त्रस्त

0
825
Google search engine
Google search engine
वायरमन राहतो बेपत्ता
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    गेल्या एका महिण्यापासुन तिवरा गावात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त गावकऱ्यांनी शनिवारी (ता. ७) स्थानिक ढोले कॉम्पेलक्स मधील विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र निवेदन घ्यायला सुध्दा एकही अधिकारी हजर नसल्याने गावकरी चांगलेच संतापले होते. आम्ही कार्यालयात येणार असल्याचे माहिती असल्यामुळे अधिकारी जाणीवपुर्वक हजर नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला.
      गेल्या एका महिण्यापासुन सगळीकडे पाऊस सुरू आहे. अशातच तालुक्यातील घुईखेड येथील पावर हाऊसवरून तिवरा येथे विज पुरवठा केला जातो. परंतु वारा, पाऊस असो किंवा नसो तरीही ७ जुनपासुन तिवरा येथे विजेचा लपंडाव सुरू आहे. कधी कधी रात्रभरसुध्दा लाईन बंद असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या संदर्भात वायरमन ला कधीही फोन केले असता उडवाउडवीचे उत्तर देतो. तसेच वेळेवर लाईनवरसुध्दा येत नाही. याशिवाय गावातील विजेचे तार लुज झाले असुन डी. पी. सुध्दा खुल्या अवस्थेत राहते. एकुणच पाहता या गावातील विजेची व्यवस्था पुर्णपणे अस्तव्यस्त झालेली आहे. याबाबतचे निवेदन गावकऱ्यांनी २८ जुन रोजी उपकार्यकारी अभियंता, चांदूर रेल्वे यांना दिले होते. तरीही या निवेदनाची दखल घेतली नव्हती. यामुळे त्रस्त १००-१५० गावकरी शनिवारी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडकले होते. परंतु कोणताही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता. आम्ही येणार असल्याच्या धाकानेच अधिकारी गायब असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
      तरी आताही गावातील विज पुरवठा सुरळीत न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा प्रविण गिरी, उपसरपंच मिलींद मेश्राम, ग्रा.पं. सदस्य किशोर निसार, सदस्य नपु भागवत, गजु पुनसे, सुरज गावंडे, शामराव तसरे, किसन जगताप, दिपक वानखडे, अंकुश भागवत, किशोर फुंडे, विनोद भागवत, संतोष राऊत, नेवारे, गौतम राऊत, प्रशांत खवसे, राजु ठवकर, सिद्धु बगाडे, आकाश आठवले, सतिष बगाडे, प्रविण पुनसे, भिमराव भोयर, प्रदिप वानखडे, मंगेश नेवारे, सतिष पुनसे, मुन्ना पनपालीया, निकेश नेवारे, करपाते, गजानन कडुकार, गजानन काळमेघ, मंगेश ढोक, सौरव आठवले, योगेश अंभोरे, दिवाकर उमाळे, अजय भोयर, गणेश टाक, दिलीप कोल्हे, श्रीधर जवंजाळ, पुनाजी अठोर, खोब्रागडे, बबन तातड आदींनी यावेळी दिला आहे. 
 
वायरमन नाही राहत मुख्यालयी
चांदूर रेल्वेवरून १५ कि. मी. अंतरावर असलेल्या तिवरा गावात वायरमन मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे रात्री – बे – रात्री विज पुरवठा खंडीत झाल्यानंतर वायरमन गावात लवकर येत नाही. याचा फटका मात्र गावकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे  वायरमन ला मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याची मागणी सुध्दा जोर धरत आहे.