श्री सिद्धीविनायक मंदिर घोटाळ्याप्रकरणी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याची शासनाची स्वीकृती : चौकशीचे आदेश !

0
1729
Google search engine
Google search engine

 

बेकायदेशीर अभ्यासदौर्‍यासाठी 13 लाख रुपये देवनिधीची उधळपट्टी !

श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने मुंबई येथे 20 फेब्रुवारी 2018 या दिवशी पत्रकार परिषद घेऊन प्रभादेवी (मुंबई) येथील श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांकडून भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा कशा प्रकारे अपहार झाला, हे पुराव्यांसह उघड केले होते. या अपहाराच्या संदर्भात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी 13 नोव्हेंबर 2017 या दिवशी श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी केलेल्या दौर्‍याच्या खर्चाच्या अनुषंगाने विधी आणि न्याय विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत सदर शासकीय विभागाने न्यासाच्या विश्‍वस्तांना विमानप्रवास अनुज्ञेय नसतांना देखील त्यांनी तिरुपती देवस्थानची पहाणी करण्यासाठी विमान प्रवास केला. यासमवेतच विश्‍वस्त श्री. प्रवीण नाईक हे रुग्णालय भेट दौर्‍यासाठी मिरज येथे गेले असतांना प्रवासाचे देयक म्हणून त्यांनी पेडणे (गोवा) येथे भरलेल्या पेट्रोलचे देयक सादर केले, असे निरीक्षण नोंदवत याची विस्तृत चौकशी करावी आणि चौकशीनिहाय अहवाल सादर करण्यासाठी या विभागातील सहसचिव दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. ही माहिती श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे सदस्य, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी दिली. 
शासनाने सिद्धीविनायक मंदिरातील घोटाळ्याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला, याबद्दल अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी समाधान व्यक्त केले; मात्र तुळजापूर येथील श्री भवानी मंदिर, तसेच कोल्हापूर श्री महालक्ष्मी मंदिर येथील शासकीय समित्यांमधील घोटाळ्यांप्रकरणी संथ गतीने चालू असलेल्या चौकशीप्रमाणे श्री सिद्धीविनायक मंदिरातील घोटाळ्याची चौकशी प्रलंबित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सिद्धीविनायक न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्यांसंदर्भातील विनाअनुमती अभ्यास दौर्‍याच्या नावाखाली कशाप्रकारे नियमबाह्य खर्च केला, यांसह अन्य अनेक बाबी उघडकीस आणल्या होत्या. तरी या माजी विश्‍वस्तांनी केलेल्या सर्व नियमबाह्य खर्चाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत आणि निश्‍चित समयमर्यादेत चौकशी पूर्ण करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.