चांदूर रेल्वेत तालुक्याला पावसाचा तडाखा पावसाने अक्षरश: काढले झोडपून

0
890
Google search engine
Google search engine

अनेक गावांचा तुटला होता संपर्क

दोन पुलांच्या मधात अडकलेल्या शिक्षकांना सुखरूप काढले बाहेर

प्रशासन व गावकऱ्यांची समयसुचकता 

(सर्व फोटो – शहेजाद खान)

चांदूर रेल्वे – 

     चांदूर रेल्वे तालुक्याला मंगळवारी व बुधवारी सकाळी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मंगळवारी पासून सुरू झालेल्या पावसाचा प्रचंड जोर होता. या पावसामुळे तालुक्यात सखल भागात पाणी तर साचलेच शिवाय रात्री बहुसंख्य रस्ते जलमय झाले होते. याशिवाय सावंगी संगम – धानोरा मोगल रस्त्यावर बुधवारी सकाळी ८ वाजता असलेल्या दोन नाल्यांच्या मधात अडकलेल्या तीन शिक्षकांना प्रशासन व गावकऱ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर साडेचार तासानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले.

      गेल्या तीन – चार दिवसापासून तालुक्यात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. यासोबतच मंगळवारी मध्यरात्रीपासुन ते बुधवारी सकाळी ११ वाजतापर्यंत एकसारख्या झालेल्या पावसामुळे चांदूर रेल्वे तालुक्यात जनजिवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. घुईखेड, मोगरा जवळील खोलाड व चंद्रभागा नदीला पुर आल्याने घुईखेड, येरड, मोगरा, कवठा कडू, पळसखेड, राजुरा, एकपाळा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले होते. यासोबत घुईखेड गावात श्रीराम सहारे यांच्याजवळ तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाण पाणी साचले होते. तसेच घुईखेड परीसरातील ढगफुटीसारखा प्रकार घडल्याने तेथील सुभाष गोटफोडे, चंद्रशेखर शेंडे, भाऊराव शेंडे, विठ्ठलराव धामणकर, जनार्धन शेंडे या शेतकऱ्यांसह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने त्यांची पिके जलमय झालेली आहे. त्याचप्रमाणे बेंबळा प्रकल्पाच्या चुकीच्या धोरणामुळे घुईखेड गावच्या बनविण्यात आलेल्या नाल्यामुळे अनेक गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरत आहे. घुईखेडजवळील येरड गावचे पुनर्वसन खरबी येथे झालेले असून येथील शेतकऱ्यांच्या शेतात सुध्दा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे.

    याशिवाय धामक येथे गावाला लागुनच बेंबळा नदी असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बेंबळ्याच्या काठावर गावाला लागुनच असलेल्या बाबा खान यांच्या हॉटेलात तसेच बंडुजी, शिवाजी बैरागी, रामा बैरागी यांच्या घरातसुध्दा पाणी शिरले. याच बेंबळा नदीचे पाणी निर्मल गुगलीया, अब्दुल मतीन यांच्या घरापर्यंत पोहचलेले असून धामकच्या वरच्या बाजुला असलेल्या मिलमिली या नदीमुळे व बेंबळा नदीने गावाला चहुबाजुने पाण्याचा वेढा बसलेला आहे. यासोबतच धामक ते बेलोरा मार्गावरील पुलाला पुर आल्यामुळे वाहतुक बंद झाली असुन येवती, कुऱ्हेगाव कडे जाणारा मार्गसुध्दा बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना गावाबाहेर जाणे अशक्य झाले आहे. राजुरा गावातील आठवडी बाजाराजवळील विनोद बन्सोड यांच्याघरापर्यंत पाणी खोलाड नदीचे पाणी आले होते. तसेच याच गावातील मंदिराच्या आजुबाजुनेसुध्दा नदीसारखी परीस्थिती निर्माण झाली होती. दिघी कोल्हे गावाला लागुनच असलेल्या नाल्याचे पाणी गावात तसेच शेतीमध्ये घुसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बग्गी गावात सुध्दा नदीला पुर आल्या असून गावातील सुरेश खेकाडे, ओंकारराव सुधरी, अजय इंगळे, हरीभाऊ बोडखे, प्रविण चव्हाळे यांच्या शेतात पाणी घुसले आहे.

    चांदूर रेल्वे तालुक्यात रेल्वे गेट च्या बाहेरील भागात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे रेल्वे गेटच्या आतील भागात म्हणजेच शहरात मात्र रीपरीप पाण्यामुळे कुठेही पाणी साचलेले दिसत नाही. अशातच एकीकडे अति पावसामुळे पाण्याचा हाहाकार सुरू आहे तर दुसरीकडे चांदूर रेल्वे शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे. कारण मालखेड तलावात आतापर्यंत फक्त १ फुट पाण्याची वाढ झाल्याची माहिती आहे. यामुळे तलावात केवळ १० टक्केच्या आत पाणीसाठा असल्याचे चित्र दिसत आहे.

सावंगी संगम – धानोरा मोगल रस्त्यावर असलेल्या दोन नाल्यांच्या मधात अडकले होते तीन शिक्षक

   चांदूर रेल्वे तालुक्यात झालेल्या पावसाच्या तडाख्याने अनेक नदी, नाल्यांना पुर आला होता. तालुक्यातील राजुरा येथील खंडेराव देशमुख माध्यमिक विद्यालयात असलेले शिक्षक गजानन सुखदेवराव हरणे, अरूण कृष्णराव भराडे व शारदा पांडुरंगजी हिवरे तिघेही रा. अमरावती हे सकाळी एमएच २७ एसी ५४३० या क्रमांकाच्या ईस्टीलो कारने विद्यालयात जात असतांना धानोरा मोगल सावंगी संगम या रस्त्यावरील राईघुई नदी व नाल्याच्या मधातील रस्त्यावर अडकले होते. सुरूवातीला ते राईघुई नदीवरील पुलावरून निघाले व पुढे थोड्या अंतरावर असलेल्या नाल्यावरील पुलावर मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने ते पुढे जाऊ शकले नाही. त्यामुळे ते परतण्यासाठी निघाले असता नदीवरील पुलावर देखील तेवढ्या चांगलेच वेळा पाणी जमा झाले होते. यामुळे तीघेही शिक्षक सकाळी ८ च्या दरम्यान मधातच अडकले. ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता तहसिलदार बी. एन. राठोड, मंडळ अधिकारी अमोल देशमुख, निलेश स्थुल, सतिष गोसावी यांच्यासह ठाणेदार ब्रम्हदेव शेळके घटनास्थळी पोहचले. पुलावरील पावसाचा वेग जास्त असल्याने थोडा वेळ पावसाची गती कमी होण्याची वाट बघितली. त्यानंतर सावंगी संगम येथील दिपक शिंदे, सुरेंद्र शिंदे यांच्यासह गावातील काही नागरीकांनी दोरीच्या सहाय्याने दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास तीनही शिक्षकांना सुखरून बाहेर काढले. या संपुर्ण घटनेची माहितीचे अपडेट उपविभागीय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे फोनवरून तहसिलदार यांच्याकडुन घेत होत्या. प्रशासनाच्या व गावकऱ्यांच्या तत्परतेने तीनही शिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आ. विरेंद्र जगताप यांची विधानसभेच समयसुचकता

   नाली व नदीच्या पुरामुळे अडकलेल्या तीन शिक्षकांच्या मदतीसाठी तत्काळ रेस्क्यु टीम पाठविण्याची मागणी आमदार विरेंद्र जगताप यांनी बुधवारी सकाळी १०.३० वाजता विधानसभेत केली होती. यानंतर रेस्क्यु टीम घटनास्थळी पोहचली होती. मात्र तत्पुर्वीच गावकऱ्यांच्या मदतीने शिक्षकांना बाहेर काढण्यात आले. असे असले तरी आ. विरेंद्र जगताप यांची विधानसभेतील समयसुचकता यावेळी दिसून झाली. 

हे मार्ग झाले होते बंद 

  एकपाळा जवळील पुलावर पाणी वाहत असल्यामुळे चांदूर रेल्वे – नांदगाव रस्ता, धामक येथील नदीच्या पुलावर पाणी असल्यामुळे चांदूर रेल्वे – धामक – बेलोरा, राईघुई नदीचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे सावंगी संगम – धानोरा मोगल रस्ता आदी रस्त्यांवरील वाहतुक बंद झाली होती.

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या

तालुक्यातील घुईखेड जि. प. सर्कलमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी घुसल्याने अतोणात नुकसान झाले आहे. सदर शेतींची पाहणी जि.प. सदस्या सौ. राधिकाताई घुईखेडकर, माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर, घुईखेडचे सरपंच विनय गोटफोडे यांनी करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

धामक गाव धोक्यात

धामकच्या वरच्या बाजुला असलेल्या मिलमिली या नदीमुळे व बेंबळा नदीने गावाला चहुबाजुने पाण्याचा वेढा बसलेला आहे. यासोबतच धामक ते बेलोरा मार्गावरील पुलाला पुर आल्यामुळे वाहतुक बंद झाली तसेच येवती, कुऱ्हेगाव कडे जाणारा मार्गही बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना गावाबाहेर जाणे अशक्य झाले आहे. या गावात प्राणहाणी होण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे सद्यातरी धामक गावाला धोक्याची घंटा असल्याचे चित्र आहे.