करवसुलीसाठी दाखले अडवू नका जिल्हाधिकाऱ्यांचे भातकुली नगर पंचायतला आदेश >< तुघलकी कारभाराविरोधात श्री शिवराय कुळकर्णी यांची तक्रार

0
898

भातकुली :-

घराचा कर भरला नाही म्हणून विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी लागणारे, शेतकऱयांना पिककर्जासाठी लागणारे आणि लोकांना वैद्यकीय सेवेसाठी लागणारे रहिवासी दाखले न देण्याचा व त्यापूर्वी घर कर भरण्यासाठी अडवणूक करण्याचा तुघलकी निर्णय मागे घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी भातकुली नगर पंचायतला दिले आहेत.
आज भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी भातकुलीच्या लोकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना याप्रकरणी तक्रार केली होती.

भातकुली नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी शेळके यांनी तुघलकी धोरण अंमलात आणले आहे. कर वसुली करण्याचा त्यांचा अधिकार असला तरी विद्यार्थ्यांना दाखले देण्यापासून शेळके यांनी अडवणूक सुरू केली आहे. पहिले मालमत्ता कर भरा नंतरच दाखला मिळेल, अशी भूमीका घेतल्याने विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची मोठी अडचण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांना देखील पिककर्जासाठी किंवा बँक व्यवहारांसाठी रहिवासी दाखल्याची आवश्यकता पडल्यास कर वसुलीचे निमित्त सुरू करून त्यांची अडवणूक सुरू केली आहे. शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा दाखल्याची गरज असते. लोकांची निकड लक्षात घेता करवसुलीच्या सबबीखाली त्यांना भातकुली नगर पंचायतने दाखले न देण्याचे तुघलकी धोरण स्वीकारले.
कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण आहे. सोबतच शेतकरी देखील संकटात असताना असे धोरण अवलंबू नये, अशी विनंती अनेकांनी प्रभारी मुख्याधिकारी शेळके यांना केली. मात्र, लोकांना उर्मट व उद्धट उत्तर मिळाले. एक तर शेळके फारच कमी काळ भातकुलीमध्ये असतात. परिणामी लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुर्दैवाने, लोक निर्वाचित नगर पंचायत सदस्यांनी देखील शेळके यांच्या दंडेली समोर लोटांगण घातल्याने गरजू लोक दाखल्यांपासून वंचित झाले.
आज श्री शिवराय कुळकर्णी यांनी जिल्हाधिकारी श्री अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शेळके यांच्या तुघलकी कारभाराची तक्रार केली. यावर जिल्हाधिकाऱयांनी तात्काळ शेळके यांना हे धोरण योग्य नसल्याचे सांगितले. महसूल वसूल करण्यासाठी आणखी अन्य मार्गांचा वापर करा. पण शालेय शिक्षणापासून, वैद्यकीय सेवेपासून आणि शेतकरी पिककर्जापासून वंचित राहता कामा नये असे जिल्हाधिकाऱयांनी शेळके यांना बजावले.
शिवराय कुळकर्णी यांच्यासह भाजपाचे भातकुली शहराध्यक्ष बाळासाहेब भजभूजे, भाजयुमोचे जिल्हा सचिव सतीश आठवले, पत्रकार मोहम्मद सादिक, उज्वल अंबाडे, दिनेश खेडकर, नरेंद्र काळसरपे, विनोद सवई, राहुल बोरा, निखिल पारसे, गजानन रोराळे, अर्पण भजभूजे, अमोल वैद्य, सतीश बैलमारे, अमोल रेलपाडे, तुषार उघडे, प्रदीप माहोरे उपस्थित होते.