अमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे शनिशिंगणापूर मंदिराच्या सरकारीकरणाचा विरोध

0
816
Google search engine
Google search engine
अमरावती (वार्ता) ः 20 तारखेला   स्थानिक जयस्तंभ चौक येथे सायंकाळी ४ ते ६ यावेळेत पुढील दोन मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रीय हिंदु आंदोलन घेण्यात आले.
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणार्‍या महाराष्ट्र शासनाने शिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर देवस्थानाचे सरकारीकरण करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिर, मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी येथील श्री साई संस्थान, तसेच पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बनवून त्याद्वारे तब्बल ३०६७ मंदिरे ताब्यात घेतली. या सर्व मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले. प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारला. देवनिधी लुटणार्‍या पापी व्यक्तींना शिक्षा न देणार्‍या शासनाला श्री शनैश्‍वर देवस्थान ताब्यात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. शासनाने श्री शनैश्‍वर देवस्थानचे सरकारीकरण तत्काळ रहित करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावे. शासनाने ताब्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्‍यांवर अद्याप कारवाई का केली नाही, त्या भ्रष्टाचार्‍यांना मोकाट का सोडले आहे, याची उत्तरे द्यावीत; अन्यथा शासनावर श्री शनिदेवच नाही, तर हिंदूंचाही कोप होईल, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी व्यक्त केली. या श्री शनैश्‍वर देवस्थानच्या सरकारीकरणाच्या विरोधात छेडण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.
हज हाऊसला हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टीपू सुलतानचे नाव देऊन
त्याचे उदात्तीकरण करणारा निर्णय कर्नाटक शासनाने रहित करावा !
इतिहासात क्रूरकर्मा म्हणून नोंद असणार्‍या टीपू सुलतानचे नाव हज हाऊसला देण्याचा निर्णय कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसी शासनाने घेतला आहे.हिंदुविरोधी टीपू सुलतानचे नाव हज हाऊसला देऊन जेडीएस आणि काँग्रेस शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे ? यातून जेडीएस आणि काँग्रेस शासनाला मुसलमानांनीही टीपू सुलतानप्रमाणे क्रूरकर्मा बनावे, असेच सुचवायचे आहे काय? तरी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा, सर्व मुसलमानेतरांना (हिंदूंना) मुसलमान बनवण्याची शपथ घेणारा, मंदिरांत गोहत्या करणारा, मंदिरे उध्वस्त करून देवतांच्या मूर्तींचे भंजन करणारा असा टीपू सुलतानचा क्रौर्यशाली इतिहास पहाता क्रूरकर्मा टीपू सुलतानचे नाव हज भवनला देणे, म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांवर मीठ चोळल्यासारखे होईल. त्यामुळे कर्नाटक शासनाने हज हाऊसला टीपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
या वेळी आंदोलनाला योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, विश्व हिंदू परिषदचे  सागर खेडकर, एकविरादेवी संस्थांचे शरदजी अग्रवाल, अंबादेवी संस्थांचे सौ. विद्याताई देशपांडे, शिवसेनेचे नरेंद्र केवले, कांचन ताई ठाकूर, श्री. शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानचे श्री. महेश लढके, अभिषेक दीक्षित, निषाद जोध, करण धोटे, शशांक जोशी,बजरंग दलचे विपीन गुप्ता,  ब तसेच मुकुल कापसे,मिलिंद साखरे, अभय कडुकार, आनंद डाउ, स्वराज शर्मा,  या मान्यवरांसह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.