…….अन्यथा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करून कार्यालयाला कुलुप ठोकणार – जनता दल (से.) चा जिल्हाधिकाऱ्यांना ७ दिवसांचा अल्टीमेटम

0
1234

अपंग प्रकल्पग्रस्ताला अपमानास्पद वागणुक देऊन भुखंड जप्तीची धमकी दिल्याचे प्रकरण

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)

चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथील एका अपंग प्रकल्पग्रस्ताला अमरावती जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाणे यांनी अपमानास्पद वागणुक देऊन भुखंड जप्तीची धमकी दिल्याच्या प्रकरणी जनता दल (से.) ने जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अधिकाऱ्याविरूध्द कारवाईसाठी ७ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. येत्या ७ दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांची खुर्ची जप्त करून त्यांच्या कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा इशारा दिला आहे.

   चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड बाजार या गावातील अपंग प्रकल्पग्रस्त संजय डगवार हे येरड पुनर्वसन गावठाण मधील भूखंड प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता जिल्हा पुनर्वसन अधिकारी (उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन) अजय लहाणे यांच्या कार्यालयात गेले असता त्यांनी दमदाटी करीत आधी पैसे भरा त्यानंतर तुम्हाला भुखंड प्रमाणपत्र मिळेल असे म्हटले. तसेच मोठ्या आवाजात बोलून दबंगगिरी करीत भूखंडाचे पैसे न भरल्यास तुमचा भूखंड जप्त करेल अशी धमकी सुद्धा दिल्याचे निवेदनात नमुद आहे. संजय डगवार यांनी त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिले की, या अगोदर बऱ्याच लोकांना पैसे न भरता प्रमाणपत्र वाटले, तेव्हा अजय लहाणे म्हणाले की,  माझे कर्मचारी मूर्ख आहेत, त्यांनी प्रमाणपत्र वाटले असेल मात्र मी प्रमाणपत्र देणार नाही असे मोठमोठ्या आवाजात म्हटले व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. २६ जुलै रोजी अपंग व्यक्तीने दिवसभर जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला असतांना सदर अधिकाऱ्याला डगवार यांना थोडीही विचारपुस करण्यासाठी वेळ मिळाला नाही असे जनता दल कार्यकर्त्यांनी म्हटले असून अधिकाऱ्याच्या अशा कृत्याचा त्यांनी निषेध केला आहे.

     विविध शासकीय योजनेपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये असे सरकारचे आदेश असतांना काही मुजोर अधिकारी लाभार्थ्यांवर अन्याय करीत असे कागदपत्रे अडकवितात. अशा अधिकाऱ्यांना योग्य तो धडा प्रशासनाने शिकवणे गरजेचे आहे. उद्धट वर्तणूक करणाऱ्या या जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यावर येत्या ७ दिवसांत कारवाई करून अन्यायग्रस्त अपंग व्यक्ती संजय विठ्ठलराव डगवार यांना न्याय देण्यात यावा व याबाबत अपंग व्यक्तीसोबत आपल्या कार्यालयाव्दारे पत्रव्यवहार करण्यात यावा, अन्यथा जनता दल (से.) तर्फे अजय लहाणे या अधिकाऱ्याची कार्यालयातील खुर्ची जप्त करून जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयाला ताला ठोकू अशी चेतावनी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे, मेहमुद हुसेन, शंकरराव आंबटकर, धर्मराज वरघट, अंबादास हरणे, सुधिर सव्वालाखे, रमेश गुल्हाणे, अशोक हांडे, साहेबराव शेळके, महादेवराव शेंद्रे, डॉ. उत्तमराव पडोळे आदी कार्यकर्त्यांसह शहरातील अपंग बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, अमरावती यांना निवेदनातुन दिली आहे. याची निवेदनाची प्रतिलीपी एसडीओ यांना सुध्दा देण्यात आली.

अधिकाऱ्याला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ्य बसणार नाही – गौरव सव्वालाखे

अपंग व्यक्तींसोबत अधिकाऱ्यांनी सन्मानाने बोलले पाहिजे. असे उच्चपदस्थ अधिकारी जर अपंग व्यक्तींना अशी वागणूक देत असतील  तर सामान्य व्यक्ती सोबत कसे वागत असतील याचा विचार न केलेला बरा. त्यामुळे जिल्हाधिकारी, अमरावती यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यावर तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा सदर अधिकाऱ्याला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ्य बसणार नसल्याचे जनता दलाचे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे यांनी म्हटले.