भारतासाठी नवी डाेकेदुखी !

0
1736
         ‘जगात सर्व देशांना सैन्य आहे; मात्र पाकिस्तान हे असे एकच ठिकाण आहे की, जेथे सैन्याला एक देश आहे’, असे म्हणतात. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या तथाकथित निवडणुकीमध्येही त्याचे प्रत्यंतर आले. पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तथा ‘तेहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या, तर तुलनेने अन्य पक्षांना फारसे काही हाती लागले नाही. यामागे पाकिस्तानी सैन्याचाच हात आहे, हे उघड सत्य आहे. 

 
कट्टरपंथी विजयी !
      पाकिस्तानच्या निवडणुकीच्या निकालामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे पाकिस्तानी लोकांची जिहादी मानसिकता ! भारतातील तथाकथित बुद्धीजीवी मंडळींकडून नेहमी असा दावा केला जातो की, सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेच्या मनात भारतद्वेष नाही, त्यांना शांतता आणि संवाद हवा आहे. त्यामुळे भारताने काश्मीरच्या सूत्रावर चर्चेनेच तोडगा काढावा. या दाव्याला निवडणुकीच्या निकालामुळे पूर्ण छेद गेला आहे; कारण पाकिस्तानी जनतेनेही जिहादी मानसिकता असलेल्यांच्या पारड्यातच त्यांची मते टाकली आहेत. यावरून पाकिस्तानी मुसलमानांचा कल दिसून येतो. या निवडणुकीमध्ये मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार हफीज सईद हाही जिंकून आला. याव्यतिरिक्त कट्टरतावादी मुल्ला-मौलवींकडून चालवल्या जाणार्‍या जमात-ए-इस्लामी, जमात उलेमा-ए-इस्लाम यांसारख्या पक्षांनाही निवडणुकीत बर्‍यापैकी यश मिळाले.
 
भारतद्वेषाचा पाया !
     पाकिस्तानी सैन्याच्या पाठबळामुळे निवडून आलेल्या या सर्वांचा भारतद्वेष आणि हिंदुद्वेष हाच एकमेव समान पाया आहे.  पाकिस्तानचा जन्मच मूळात हिंदुद्वेषापोटी झाला आहे आणि द्वेषाच्या पायावर निर्माण झालेली इमारत दीर्घकाळ उभी राहू शकत नाही. पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवून लोकशाही मार्गाने व्यक्ती पंतप्रधानपदाच्या खूर्चीत बसत असल्याचे वरकरणी दिसत असले, तरी वस्तूस्थिती तशी नाही. देशाची सूत्रे कुणाच्या हाती द्यायची, हे तेथील सैन्य ठरवते. पाकिस्तानी सैन्य आणि आय.एस्.आय. ही कुख्यात गुप्तहेर संघटना अशाच व्यक्तीला प्रमुखपदी बसवते की, जी पाकिस्तानी सैन्याच्या इशार्‍यावर नाचेल. ‘भारतद्वेष, भारतविरोधी कारवाया आणि आतंकवादी आक्रमणे’ हाच पाकिस्तानी सैन्याचा एकमेव धंदा आहे. हा धंदा तेजीत चालण्यासाठी जो कुणी साहाय्य करेल, तसेच कायदेशीर, आर्थिक नि तार्किक आडकाठी करणार नाही, अशी व्यक्ती ही पंतप्रधान बनण्यास लायक आहे’, असा एक अघोषित निकष पाकिस्तानमध्ये आहे. इम्रान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांनी निवडणुकीच्या निकालानंतर दिलेली प्रतिक्रिया त्यावरच शिक्कामोर्तब करणारी आहे. ‘पाकिस्तानी लष्कराला बूट पॉलीश करणार्‍याचीच आवश्यकता होती आणि त्यासाठी सद्य:स्थितीत इम्रान खान यांच्या व्यतिरिक्त दुसरी योग्य व्यक्ती नाही’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून पाकिस्तानचे राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे, हे स्पष्ट आहे. ‘एक वेळ गवत खाऊन राहू; पण हिंदु भारतापासून संरक्षण करण्यासाठी अणूबॉम्ब बनवूच’, अशी वल्गना करणार्‍या झुल्फिकार अली भुट्टो यांची विद्वेषी परंपराच तेथील प्रमुखांनी आतापर्यंत चालवली आहे.
 
पकिस्तानमधील अराजक !
        वास्तविक आज पाकिस्तान स्वतः अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानने पोसलेला आतंकवाद आज त्याच देशावर उलटू लागला आहे. प्रचारसभेत घातपात, रक्तपात होणे, आतंकवादी आक्रमणे होणे, हे आता तेथे सवयीचे बनले आहे. एकीकडे अमेरिकेने अर्थसाहाय्य अल्प करून पाकिस्तानच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे, तर आतंकवादी आसुरी चेहर्‍यामुळे जगातील इतर देशांनीही पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली आहे. एकमेव चीन काय तो पाकिस्तानला साहाय्य करत आहे; मात्र ते निरपेक्ष साहाय्य नसून कर्ज आहे आणि या कर्जाच्या दबावाखाली पाकिस्तान दबून गेला आहे. बलुचिस्तान प्रांतातही असंतोष आहे. न्यायव्यवस्थाही केवळ नावालाच आहे. अशा अराजकसदृश परिस्थितीतही पाकड्यांमध्ये युद्धाची खुमखुमी जिवंत आहे.
 
भारतासाठी धोक्याची घंटा !
         भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये नेहमीच तणावपूर्ण वातावरण असते. तो केवळ सामना रहात नाही, तर त्याला युद्धाचे स्वरूप येते. आता तर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार यांना युद्धभूमी म्हणून संपूर्ण देशच मिळाला आहे. मुल्लामौलवी आणि मिल्ट्री यांचे पाकमधे शासन आल्यानंतर भारतासाठी धोका उत्पन्न होतो, हा इतिहास आहे. त्यामुळे भारताने सावध आणि आक्रमक होण्याची आवश्यकता आहे.

 

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.
संपर्क : 7775858387