चांदूर रेल्वेत पहिल्यांदाच प्लास्टीक विरोधी मोहीम – २० व्यावसायीकांकडून १५ हजाराची दंडात्मक वसूली

0
1309
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)

राज्यात प्लास्टिक बंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत असतांना चांदूर रेल्वे शहरात अद्यापही एकही कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर नगर परीषदेला गुरूवारी जाग आली असून प्लास्टीक वापरणाऱ्या २० दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

शासनाच्या वतीने प्लास्टिक पासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (कॅरीबॅग, हॅंडल असलेल्या व नसलेल्या थैल्या) थर्माकाेल व प्लास्टिक पासून बनवण्यात आलेले व एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे ताट, कप, ग्लास, चमचे, वाटी, भांडे तसेच हॉटेल्समध्ये पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, नाॅन वोवेन पॉलीप्रोपिलीन बॅग्ज, सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, थर्माकोल, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ आदी साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मात्र शहरात प्लास्टीकचा सर्रास वापर होत असल्याची बाब नगर परीषदेला माहित होताच अखेर गुरूवारी प्लास्टीक विरोधी मोहीम चालविण्यात आली.

यामध्ये शहरातील मेन रोडवरील शिवधारा बुट हाऊस, अंश फोटो स्टुडिओ, न्यु क्विन जनरल स्टोअर्स, गिलबील मेन्स वेअर, सतिष साखरकर, गाडगेबाबा मार्केटमधील साई अॅक्वाकुल, दिपाली टोबॅको अँन्ड किराणा, संकेत प्रोव्हीजन्स, संतोषी माता दुध डेअरी, शिव मोबाईल शॉपी, विलास डोळस यांचे भाजीपाला दुकान, मधुबन दुध डेअरी, मुख्य मार्केटमधील धिरज प्रोव्हीजन्स, पवन पान मटेरीअल, बालाजी बिकानेर स्विट्स, सपना कलेक्शन, संस्कृती ड्रेसेस, सारथी ड्रेसेस, पवन ड्रेसेस, शिव नॉव्हेल्टी जनरल स्टोअर्स अशा २० दुकानांवर एकूण १५ हजार रूपयांचा ठोठावण्यात आला. या मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या मोहीमेत नगर परीषदेचे मुख्याधिकारी मिलींद दारोकार, ड्रीस्टीक कोऑर्डीनेटर शाहाजी चौहान, आरोग्य निरीक्षक नितीन इमले, समाजकल्याण पर्यवेक्षक सौ. भाग्यश्री कांडलकर, समूह संघटिका सौ. स्वाती गणोरकर, कर्मचारी जितेंद्र कर्से, संजय वानखडे, संजय कर्से, अनिल इमले यांचा सहभाग होता.

दुकानासमोर डस्टबीन ठेवा – मुख्याधिकारी

दुकानासमोर डस्टबीन ठेऊन ओल व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून घंटागाडीत टाकावा. कचरा इतरत्र दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी दारोकार यांनी या मोहिमेदरम्यान दुकानदारांना दिला.