भाजपाने जळगाव महापालिका केली काबीज तर सांगलीत बहुमताकडे वाटचाल.

0
884
Google search engine
Google search engine

जळगाव महापालिका निवडणुकीत सुरेश जैन आणि शिवसेनेला हादरा बसला असून या निवडणुकीत ७५ जागांपैकी भाजपाने ५७ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले असून सुरेश जैन यांच्यासाठी हा मोठा हादरा असल्याचे मानले जाते.जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी १ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. या जागांसाठी एकूण ३०३ उमेदवार रिंगणात होते. जळगावमध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. जळगावमध्ये सुरुवातीला शिवसेना- भाजपा युती झाली होती. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चुली मांडत सर्व जागांवर उमेदवार उभे केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही रिंगणात असली तरी खरी लढत शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात होती.शिवसेनेतर्फे आदेश बांदेकर, संजय सावंत, नीलम गोऱ्हे, पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री दादा भुसे यांनी हजेरी लावली. सुरेश जैन यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मदतीने खिंड लढवली. तर भाजपाकडून गिरीश महाजन आणि शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी धूरा सांभाळली. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने बाजी मारली. भाजपाने ५७ जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेना १५ तर एमआयएम पक्षाला ३ जागांवर विजय मिळाला. गेल्या ३५ वर्षांपासून जळगाव महापालिकेवर सुरेश जैन यांचे वर्चस्व असून या पराभवामुळे सुरेश जैन यांना हादरा बसला आहे.