सरपंचासह १३ सदस्य अपात्र – अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय.कराची थकबाकी भोवली

0
1962
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे वरून १७ कि. मी. अंतरावरील कुर्‍हा येथील सरपंचासह १३ ग्रामपंचायत सदस्यांना अपर जिल्हाधिकारी के.आर. परदेशी यांच्या न्यायालयाने अपात्र ठरविले. मागील अर्ज प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांत ग्रामपंचायत कर भरला नसल्याचे प्रकरण कुऱ्हा येथील रहिवासी शहजाद शेख महेमूद पटेल यांनी दाखल केले होते.

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाने सत्ता स्थापन केली होती. अडीच वर्षाच्या फार्मूल्यानुसार भाकपचे विजयसिंह नाहाटे हे प्रथम सरपंच पदावर आरूढ झाले होते.

मात्र डिसेंबर २०१७ मध्ये कार्यकाळ पूर्ण होऊनही नहाचेंनी सरपंच पद सोडले नव्हते. परिणामी जानेवारी २०१८ मध्ये शहजाद पटेल, सैय्यद जहांगीर, अमोल बंगरे, सविता राऊत या काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले होते. यानंतर शहजाद पटेल यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ह) अन्वये सरपंच विजयसिंह नाहाटे, उपसरपंच राजाभाऊ बाभुळकर, सदस्य अब्दुल शकीर अब्दुल सत्तार, रेखा कुऱ्हेकर, अनिता गायगोले, उमेश मेसरे, सुनंदा मेसरे, जयश्री वंदेकर, फरजाना बानो अब्दुल हफिज तसेच भाजप सदस्य राजेंद्र लिलर्व्हे, कल्पना कुंजाम, सविता डहाके, संगीता पवार यांच्यासह ग्रामसचिवाविरुद्ध न्यायालयात अपील दाखल केले होते. या सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत कराचा भरणा विहित मुदतीच्या आत केला नसल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. खुद्द सरपंच नाहाटे यांना ७ जुलै २०१७ रोजी मागणी केल्यानंतर त्यांनी १८८ दिवसांनी १० जानेवारी २०१८ रोजी कर रकमेचा भरना केला. त्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचासह १३ सदस्यांना अपात्र ठरविले. या निर्णयामुळे कुऱ्हा परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.