चांदूर रेल्वे येथे ४० ते ५० मराठा आंदोलनकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल १४ आरोपींना अटक – दुध डेअरी तोडफोड प्रकरण

0
1054
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
शनिवारी चांदूर रेल्वे शहरात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान एका दुध डेअरीची तोडफोड करणे आंदोलकांना चांगलेच भोवले आहे. तब्बल ४० ते ५० आंदोलनकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ आरोपींना पोलीसांनी रविवारी अटक केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे शनिवारी संपुर्ण चांदूर रेल्वे शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. या बंद दरम्यान काही युवकांनी शहरातील गाडगेबाबा मार्केट मधील सैय्यद आसिफ सैय्यद सादीक यांच्या मालकीचे रघुविर दुध डेअरीची तोडफोड करून नुकसान केले होते. तसेच डेअरीसमोर उभे असलेले सै. आसिफ यांच्या तिन चाकी गाडीचे समोरील काच सुध्दा फोडण्यात आले होते. याची तक्रार चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला देऊन एकुण अंदाजे २० हजारांचे नुकसान झाल्याचे सै. आसिफ यांनी  सांगितले. यानंतर पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. डेअरी जवळ दुसऱ्या व्यावसायीकाचा असलेला सि. सि. टी. व्ही. कॅमेरामध्ये सदर बाब कैद झाली होती. पोलीसांनी ते सि. सि. टी. व्ही. फुटेज तपासले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीसांनी ४० ते ५० आंदोलनकर्त्यांविरूध्द गुन्हा नोंदविला. यापैकी पंकज रमेशराव माने, रितेश प्रमोद गुजर, रोहीत चंदुलाल बाबर, गोलु उर्फ सागर गजानन यादव, संदिप दामोधर जरे, सोनु उर्फ निलेश चंदु गायकवाड, पवन महादेवराव यादव, आकाश बंडु यादव, स्वप्निल श्रीधर जरे, निखील विनोद पवार, निखील गजानन यादव, निशीकांत प्रमोदराव गुजर, सुरज दिपकराव इंगळे व आयोजक किशोर श्रीधरराव यादव अशा १४ आरोपींना चांदूर रेल्वे पोलीसांनी अटक केली आहे. अटक आरोपींविरूध्द कलम १४३, ३३६, ४४७, ४५२ भादवी अन्वये, १३५ बीपी अॅक्ट व क्रिमीनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लसंते, एएसआय मोतीराम पवार व इतर सहकारी करीत आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.