एकलव्यच्या भुषणची भारतीय जिम्नॅस्टिक्स संघात निवड- प्रा. श्री निलेश जोशी यांना मार्गदर्शक म्हणून संधी

0
1059
Google search engine
Google search engine

भुषण देशमुख व प्रा. निलेश जोशी यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर.

जळगाव :-

दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ दरम्यान उलानबतार, मंगोलिया येथे होणा-या एरोबिक जिम्नॅस्टिक्स आशियाई चषक स्पर्धेसाठी खान्देशातून प्रथमच भूषण देशमुख या खेळाडूची भारतीय संघात निवड झाली. त्याच प्रमाणे प्रा. निलेश जोशी यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची संधी प्राप्त झाली. भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटना व तामिळनाडू जिम्नॅस्टिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑगस्ट २०१८ रोजी या स्पर्धेसाठीची निवड चाचणी सेंटर ऑफ स्पोर्ट्स सायन्स, श्री रामचंद्र मेडिकल युनिव्हर्सिटी, चेन्नई येथे पार पडली. या निवड चाचणीसाठी संपूर्ण भारतामधून गुजरात, मणीपूर, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, सेनादल व महाराष्ट्राच्या एकूण 70 खेळाडूंनी विविध वयोगटात सहभाग नोंदवला होता. यापैकी ज्युनिअर-२ म्हणजेच १७ वर्षाखालील वयोगटात भुषणची पुरुष एकेरी या प्रकारात निवड झाली. तो गेल्या चार वर्षांपासुन एकलव्य जिम्नॅस्टिक्स अॅकॅडमी येथे दैनंदिन सराव करत असून आतापर्यंत त्याने विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. मागच्याच वर्षी त्याची कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे झालेल्या अखिल भारतीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली होती.

प्रा. निलेश जोशी यांना या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची संधी प्राप्त झाली आहे. एकलव्य जिम्नॅस्टिक्स अॅकॅडमीद्वारे मागील चार वर्षांपासून प्रा. निलेश जोशी यांनी आजपर्यंत एकूण १६ राष्ट्रीय खेळाडू पैकी ०५ पदकप्राप्त खेळाडू आणि २८ राज्यस्तरीय खेळाडू पैकी १४ पदकप्राप्त खेळाडू घडवले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी जुलै २०१८ मध्ये अल्माटी, कझाखस्तान येथे झालेले एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शिबिर विशेष श्रेणी प्राप्त करत यशस्वीपणे पूर्ण केले.

भुषण देशमुख व प्रा. निलेश जोशी यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. नितीन चौधरी, श्री. रणजीत पाटील, श्री. सचिन महाजन, सर्व कर्मचारीवर्ग तसेच खेळाडू व पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले.