एसएफआय चे माजलगांव तहसिल कार्यालयासमोर आंदोलन

0
741
Google search engine
Google search engine

  शिष्यवृत्ती, ईबीसी, शासकीय वसतिगृहे व आयटीआय स्टायपेंड आदीच्या केल्या मागण्या
भारतीय संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांचा केला निषेध

प्रतिनिधी :- दिपक गित्ते

माजलगांव (ता.१८) : स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने शनिवार माजलगांव तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिष्यवृत्ती, ईबीसी व आयटीआय विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडच्या मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनात भारतीय संविधान जळणाऱ्या देशद्रोह्यांचा जोरदार निषेध ‘एसएफआय’ ने केला.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटले तरी देखील मागील वर्षातील शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. तसेच जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी अजूनही जाहीर केलेली नाही. या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन झाले. तसेच दिल्ली येथे काही देशद्रोही प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रति जाळल्या आणि महापुषांबद्दल अवमान करणारे वक्तव्य केले. या घटनेचा देखील ‘एसएफआय’ ने तीव्र निषेध यावेळी केला आहे.  ‘एसएफआय’ च्यावतीने ३१ जुलैला बीडमध्ये राज्यव्यापी शिष्यवृत्ती हक्क परिषद घेण्यात आली. या परिषदेने शिष्यवृत्ती, ईबीसी व आयटीआय विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडच्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलने करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनातून ‘एसएफआय’ ने पुढील मागण्या केल्याआहेत. भारतीय संविधानाच्या प्रति जाळणाऱ्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तात्काळ जाहीर करा. शिष्यवृत्तीत चालू महागाई निर्देशांकानुसार वाढ करा. व्यावसायिक अभ्यासक्रमाची ओबीसी, एनटी, व्हीजे व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा. खुल्या (ओपन) प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करा. आयटीआय विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडमध्ये वाढ करा. शालेय व महाविद्यालयीन थकीत शिष्यवृत्तीचे त्वरित वाटप करा. ईबीसी सवलतीमध्ये वाढ करा. ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी व इतर प्रवर्गातील शिष्यवृत्ती तरतुदीत कपात करणे बंद करा. अल्पसंख्यांक, सावित्रीबाई फुले, अस्वच्छ / बांधकाम कामगार व इतर सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचे वाटप करून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. डीबीटी रद्द करून शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मेस पुन्हा सुरु करा.

या आंदोलनात ‘एसएफआय’चे राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य कमिटी सदस्य सुहास झोडगे, जिल्हासचिव रुपेश चव्हाण,रामेश्वर जाधव,संतोष जाधव, राहुल मोताळे, रवि राठोड, सम्राट डोंगरे, मानव पोटभरे, नितीन राठोड, बाळु राठोड, विठ्ठल सुरवसे, तुकाराम कोरडे, कैलास गिरी,राम भाले आकाश टाकणखार,सुरज शेळके, उत्कर्ष शिंदे,, आदी कार्यकर्त्यांसह विद्यार्थी सहभागी झाले होते.