डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही !

0
908
Google search engine
Google search engine

नालासोपारा स्फोटके सापडल्याचे प्रकरण : आतंकवादविरोधी पथकाची पत्रकार परिषद

  • विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आरोप स्पष्टपणे फेटाळले !

  • सनातनवर बंदीचा नव्याने कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचे स्पष्टीकरण !

  • प्रसिद्धीमाध्यमे न्यायाधीश असल्याप्रमाणे धडधडीत लिहीत असल्याचे आतंकवादविरोधी पथकाच्या प्रमुखांचे स्पष्ट मत !

मुंबई – नालासोपारा येथे स्फोटके सापडल्याच्या प्रकरणानंतर अटक करण्यात आलेले आरोपी कोणत्या संघटनेचे आहेत, ती नावे सामाजिक माध्यमांमध्ये आली आहेत; मात्र आतापर्यंत झालेल्या अन्वेषणामध्ये अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव पुढे आलेले नाही. प्रसिद्धीमाध्यमे मात्र न्यायाधीश असल्याप्रमाणे धडधडीत लिहीत आहेत, ही वस्तूस्थिती आतंकवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी २१ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत मांडली.

या वेळी पत्रकारांनी विविध प्रकारे प्रश्‍न विचारून ‘या प्रकरणाशी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा संबंध आहे का ?’ याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र कुलकर्णी यांनी अद्याप याविषयी कोणतीही माहिती अन्वेषणात पुढे आलेली नाही, हे पुनःपुन्हा स्पष्ट केले.

 

 

 

या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देतांना कुलकर्णी म्हणाले की,

१. या प्रकरणानंतर ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांतील एकाने ‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येशी थेट संबंध आहे’, असे अन्वेषणात सांगितले आहे; मात्र अन्य ३ आरोपींचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, असे अजून तरी अन्वेषणात स्पष्ट झालेले नाही.

२. एका आरोपीने जरी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे स्पष्ट केले असले, तरी ही माहिती केवळ त्याने दिली आहे. अन्वेषणामध्ये आरोपी अशा दहा गोष्टी सांगतात. त्या सर्वांवर विश्‍वास ठेवता येत नाही. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हत्यारामधून खरोखरच गोळी झाडली गेली आहे का ?, यासाठी हत्यार पडताळणीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यात आले आहे. त्याविषयीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य पुढे येईल.

३. या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ कोण आहे, हे आतातरी सांगता येणार नाही; मात्र आमचे त्याविषयीचे अन्वेषण चालू आहे.

४. ज्या आरोपींना पकडण्यात आले आहे, ते ‘कोड’ भाषा उपयोगात आणत होते. त्यातून या सर्वांनी प्रगत प्रशिक्षण घेतले असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशभरात विविध भागांमध्ये त्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या वेळी पत्रकारांनी ‘असे प्रशिक्षण गोवा येथेही दिले गेले आहे का ?’, असे विचारले असता, कुलकर्णी यांनी ‘ज्या ज्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले आहे, त्यांतील एक ठिकाण गोवा हेही आहे’, असे सांगितले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलकर्णी यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. आरोपींकडे जी हत्यारे आणि स्फोटके मिळाली आहेत, त्यामागे त्यांचा कोणता हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गणेशोत्सव किंवा बकरी ईद यांमध्ये स्फोट करायचे होते, अशी माहिती आम्हाला मिळालेली नाही.

२. ज्या आरोपीने डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे म्हटले आहे, त्याविषयीची सर्व माहिती आम्ही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिली आहे. त्याचे पुढील अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. त्यांना जे साहाय्य हवे असेल ते आतंकवादविरोधी पथकाकडून देण्यात येईल.

३. अटक करण्यात आलेले श्रीकांत पांगारकर यांचा शिवसेनेशी काही संबंध आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता कुलकर्णी म्हणाले, ‘‘त्याने वर्ष २०१२ मध्येच शिवसेना सोडली. याविषयी शिवसेनेनेही भूमिका स्पष्ट केली आहे.’’

४. आरोपींना पैशांचा पुरवठा कुणाकडून होत होता, या प्रश्‍नाला उत्तर देतांना कुलकर्णी म्हणाले, ‘‘अधिकोषांतील आरोपींच्या खात्यांची माहिती घेण्यात आली आहे. याविषयी अन्वेषण चालू आहे.’’

अटक करण्यात आलेल्या आरोपींची डॉ. वीरेंद्र तावडे यांच्याशी थेट संबंध आला आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता कुलकर्णी म्हणाले, ‘आलाही असू शकेल. याविषयी अन्वेषण चालू आहे.’