आई व मुलावर एकाच वेळी अंत्यसंस्कार – पोळ्याच्या दिवशीच अख्ख्या गावात पसरली शोककळा ,आत्महत्येचे कारण अजुनही गुलदस्त्यात

0
680

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान )

     पोळा सणाच्या पुर्वसंध्येला चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथे आई व मुलाने एकाच दोरीच्या सहाय्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली. रविवारी पोळ्याच्या दिवशी दुपारी ३ वाजता आई व मुलावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    चांदूर रेल्वे वरून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालखेड (रेल्वे) येथील रूपेश बाळकृष्ण फुसे (वय २८) व त्याची आई शशिकला बाळकृष्ण फुसे (वय ७०) यांनी शनिवारी सायंकाळी एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन राहत्या घरीच आत्महत्या केली होती. मृतक रूपेश मुंबई येथे विद्युत मंडळात कार्यरत होता. रूपेशचे मोठे वडील चंपतराव फुसे यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे तो मुंबईवरून मालखेड गावी आला होता. परंतु काही नातेवाईकांना त्यांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीत आढळुन आले होते. यानंतर चांदूर रेल्वे पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शनिवारी रात्री ७.३० वाजता शवविच्छेदनाकरीता चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात पाठविले होते. रविवारी सकाळी ११ वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाची पत्नी मुंबईला असल्यामुळे ती दोन वर्षाच्या मुलासह रविवारी मुंबईवरून सकाळी मालखेड ला पोहचली. त्यानंतर दुपारी ३ वाजता मालखेड येथे स्मशानभुमीत आई – मुलावर सोबतच अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर फुसे याने चितेला भडाग्नी दिल्याचे समजते. या घटनेमुळे पोळा सणावर सुध्दा गावात परिणाम झाला असुन फारसा उत्साह यावेळी दिसुन आला नाही. या घटनेबाबत ठाणेदार शेळके यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दोघापैकी कोणाही जवळ चिठ्ठी वगैरे काहीही आढळून आलेली नसुन मृतक रूपेशच्या खिशात केवळ पैसे आढळुन आले. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असुन आज सोमवारी त्यांच्या पत्नीचे व इतरांचे बयान घेऊन पुढील चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आत्महत्येचं कारण अजुनही स्पष्ट झालेले नसुन मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे गावात अजुनही शोककळा कायम आहे.