आज पांढुर्ण येथे  गोटमार यात्रा-पांढुर्णा हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक गाव आहे.येथे पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी,पारंपरिक गोटमार

0
1636
Google search engine
Google search engine

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

एकमेकांवर तुफान दगडफेक करणारे लोक आज महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे दिसत आहेत. याला गोटमार यात्रा असे म्हटले जाते.

१७ शतकापासून सुरु असलेली ऐतिहासिक परंपरा असलेली पांढुर्ण्याची गोटमार आज सकाळपासून सुरू झाली आहे. मध्यप्रदेशातील पांढुर्णा व सावरगाव या दोन गावचे नागरीक ही गोटमार पोळ्याच्या पाडव्याला दरवर्षी न चुकता खेळतात. प्रशासनाने अनेक वेळा ही गोटमार रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु यात त्यांना यश आले नाही.

मध्यप्रदेशातील जवळपास ४५ हजार लोकसंख्या असलेले पांढुर्णा हे गाव. जाम नदीमुळे या गावाचे दोन भाग झाले आहे. १७ व्या शतकात या गावाच्या सभोवताल पिंडारी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. सावरगाव येथे यादव लोकांचे राज्य होते. परंतु पिंडारी लोकांनी युद्ध करून सावरगाव सुद्धा आपल्या ताब्यात घेतले होते. छिंदवाडा जिल्ह्यातील सर्वात जुना व विकसीत तालुका म्हणून पांढुर्ण्याचे नाव आहे. उद्योग धंद्यापासून ते शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा पांढुर्णा शहराचे नाव आहे. या गोटमारीला इंग्रजांनीच नाव दिल्याचा सुद्धा इतिहास आहे. या गोटामारीमुळे आज पर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. यावर्षी सुद्धा ही गोटमार होवू नये असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. परंतु नागरिकांनी ही गोटमार होणार असा निर्धारच केला आहे.

काय आहे गोटमारीचा इतिहास !

ही गोटमार सुरु होण्याकरिता अनेक दंतकथा आहेत. यापैकी तीन कथा पांढुर्णा येथील वयोवृद्ध नागरिक सांगतात. परंतु नेमक्या कोणत्या कारणामुळे ही गोटमार सुरु झाली ते मात्र सांगणारे आज कोणीही हयात नाही. नागपूरचे भोसले राजे यांची पांढुर्णा येथे सत्ता होती. येथील कारभार पाण्याचे काम त्यांनी दलपत शाह जाटबा नरेश यांच्याकडे दिले होते. परंतु नंतर शाह यांनी भोसल्यांसोबत दगाफटका केला आणि पांढुर्ण्याचे संपूर्ण राज्य आपल्याकडे घेतले. शहा यांच्याकडून राज्य घेण्याकरिता भोसले सैनिकांनी पांढुर्ण्यावर आक्रमण केले. परंतु आदिवासी राजे शहा यांच्या सेनेकडे लढण्यासाठी कोणतेही हत्यार नव्हते. यामुळे त्यांच्या सैनिकांनी गोटमार करून भोसलेचा पराभव केला. या युद्धाची आठवण म्हणून ही गोटमार होते. अशी एक आख्यायिका आहे. दुसरी दंतकथा जी सर्वांनाच माहिती आहे ती पांढुर्णा येथील मुलाची व सावरगाव येथील मुलीच्या विवाहाची. ३०० वर्षा पहिले पांढुर्णाच्या मुलाचे सावरगाव येथील मुलीवर प्रेम होते. दोघांनीही लग्न करण्याचा प्रस्ताव आपल्या कुटुंबीयाकडे ठेवला. यानंत दोन्ही गावातील वृद्ध नागरीकांनी दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचेही लग्न झाले. गावच्या नदीपर्यंत वरातीला निरोप देण्याकरिता सावरगाव येथील नागरीक आले होते. त्याच वेळी काही तरी कारणावरून वाद झाला. सावरगाव येथील नागरिक नवरीला नेण्यासाठी नकार देत होते आणि पांढुर्णा येथील नागरीक नवरीला घेवूनच जाणार असे म्हणत होते. यानंतर हा विवाद इतका झाला की दोन्ही गावातील नागरिकांनी जाम नदीवर गोडमार करण्यास सुरुवात केली. यात नवरदेव व नवरीचा मृत्यू झाला. यानंतर दोघांचेही मृतदेह हे जाम नदीच्या काठावर असलेल्या चंडीका मातेच्या मंदिर परिसरात दोघांचेही मृतदेहावर दफनविधी करण्यात आला. परंतु काही जन सांगतात की, ते दोघेही सुखरूप होते. तर काही जण म्हणतात की, नंतर मुलाने मुलीला पळवून नेले असल्याने वाद होवून दोन्ही गावातील लोकांनी गोटमार केली होती. त्याचीच आठवण म्हमून ही गोटमार खेळल्या जाते.

तिसरी दंतकथा आहे ती, दलपत शहा आणि भोसले यांच्यात होणाऱ्या दरवर्षीच्या लढाईची. वर्षातून एकदा पांढुर्णा कडून दलपत शहा यांचे सैनिक व सावरगाव कडून भोसल्यांचे सैनिक एकमेकांवर हल्ल करीत होते. जाम नदीच्या पात्रात एक बकरा ठेवण्यात येत होता. जो या बकऱ्याला घेवून जाईल तो विजयी होत होता. या बकऱ्यास जर कोणी सोडण्यास गेले तर विरुद्ध बाजूकडून गोटे मारून त्यांना हकलून लावत होते. बकरा सोडून नेल्यानंतर त्याची चंडीका मंदिरात बली देण्यात येत होती. इंग्रजांच्या काळात हा प्रथेला बंदी आणण्यात आली होती. नंतर बकऱ्याच्या जागी पळसाचे झाड जाम नदीच्या पात्रात लावण्यात येत होते. हा दंतकथेनुसारच या प्रथेला गोटमार असे नाव इंग्रजांनी दिले होते. गोट म्हणजे बकरा व मार म्हणजे विकृत करणे. बकऱ्याला विकृत करण्यावरून इंग्रजांनीच हे नाव दिल्याची दंतकथा आहे .