सामाजिक एकात्मतेने साजरा व्हावा अकोटचा गणेशोत्सव – अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर

0
779

अकोट/संतोष विणके :- अकोट शहरात गणेशोत्सव हा दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव तथा बकरी ईद व यंदा मोहरम हे दोन्ही सण सोबत आले आहेत.दोन्ही सण-उत्सव आकोट शहरात सामाजिक एकात्मतेने साजरे होत आहेत अकोट वासियांची ही एकात्मता कौतुकास्पद आहे. असे विचार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी शहर पोलिस स्टेशनला आज आयोजित शांतता समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन व्यक्त केले. सावली सभागृहात आयोजित शांतता समितीच्या आजच्या सभेला मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे तहसीलदार विश्वनाथ घुगे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार मिलींद बहाकार यांच्यासह इतर गणमान्याची उपस्थिती होती.

यावेळी पोलिस प्रशासनाने कावड मंडळासाठी आयोजित बक्षिस स्पर्धेचे वितरण करण्यात आले .यात प्रथम क्रमांक नंदीकेश्वर कावळ मंडळ द्वीतीय क्रमांक जय महाकाल मंडळ तृतीय क्रमांक नाथुबाबा मंडळ यांना देण्यात आला. बक्षिस म्हणुन शिल्ड तथा प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कावड मिरवणूक शांततेत पार पाडण्‍यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कावड मंडळांना पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे कावड उत्सव मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या कावड उत्सव मिरवणुक समितीचे अनंत मिसाळ दिगंबर सोळंके संजय गोरे यांचा प्रमाणपत्र देऊन प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तद्नंतर अकोट शहरात वाहतुकीचे नियंत्रण करता शिवाजी चौक तथा सोनू चौक येथे पोलिसांना पोलीस चौकी प्रदान करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पाटील वेल्फेअर तथा व्यापारी सुदाम राजदे यांचा जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला .तद्नंतर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी तालुक्यातील अडगाव खुर्द अकोलखेड येथिल वासीम शहा शब्बीर शहा,व शेख जब्बार शे.आयु. या सामाजिक भान जपणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या मुस्लिम अध्यक्षांची माहीती दिली. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तत्पश्चात अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात तसेच सामाजिक गणेशोत्सव बाबत माहिती तथा जनजागृती करणाऱ्या व्हिडीओ क्लिपचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन देत उपस्थितांना गणेशोत्सवाबाबत अंतर्मुख केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी राजपुत यांनी गणेश भक्तांना विसर्जनासाठी प्रशासनाची आढावा बैठक झाल्याची माहिती दिली तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सुतगिरणीच्या आवारातील गणेश कुंड निर्माण करण्याबाबत अवगत केले, तर अध्यक्षीय मनोगत अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी व्यक्त केले.सार्वजनीक गणेश उत्सव समीती अध्यक्ष गोलु भगत यांनी विसर्जन मिरवणुक संदर्भात आपली सुचना मांडली. सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनशहर ठाणेदार गजानन शेळके यांनी केले. सभेला शांतता समिती सदस्य शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला ,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी ,गणेश मंडळाचे कार्यकर्ते ,शांतता समिती सदस्य, नगरपालिका विद्युत मंडळ, महसूल पोलीस प्रशासन आदी विभागाचे अधीकारी, पत्रकार ज्येष्ठ नागरिक व्यापारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.दरम्यान अकोला जिल्ह्यात प्रथमच शांतता समिती सभे मध्ये पॉवर पॉईंट प्रेसेंटशन द्वारे संदेश देण्याचा प्रयोग पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी यशस्वी रित्या केला.उपस्थीतांनी टाळ्यांच्या कडकडाटात या प्रयोगाचे स्वागत करुन कौतुक केले.सदर शांतता समिती सभेला तेल्हारा पोलिस निरीक्षक देवरे, हिवरखेड ठाणेदार सोमनाथ पवार, दहीहंडा ठाणेदार देशमुख , अकोट शहर चे साहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर, ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे एएसआय रणजीत खेडकर हजर होते.