भारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ !

0
1280
भारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ !
भारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ !
13 सप्टेंबर या दिवशी बिहारच्या पूर्व चम्पारण जिल्ह्यातील फुलवरिया या गावामध्ये हिंदूसंघटन बैठक होती. या गावातील युवकांनी ही बैठक आयोजित केली होती. या गावात कार्यक्रमासाठी आल्यानंतर सीमेवर असलेल्या नेपाळच्या संदर्भात जी माहिती समोर आली, ती कुतूहल निर्माण करणारी होती.
 
नेपाली चलन चालणारे गाव !
 
        या गावातून नेपाळची सीमा दोन किलोमीटर अंतरावर होती. गावामध्ये आकाशवाणी लावल्यानंतर नेपाळी आकाशवाणी केंद्र चालू होत होते. गावामध्ये नेपाळी चलन सर्रास वापरले जाते. आमच्याकडून काही धर्मप्रेमी युवकांनी सनातन संस्थेचे ग्रंथ खरेदी केले. त्यापैकी एका धर्मप्रेमी युवकाने 9 रुपयांचा लघुग्रंथ खरेदी केला. त्याने दोन रुपयांचे तीन शिक्के आणि पाच रुपयांची नेपाळी रुपयाची नोट आमच्या हातात ठेवली. भारतीय मूल्यानुसार नेपाळचे पाच रुपये म्हणजे तीन भारतीय रुपये होतात. एकूण हिशोब नऊ रुपये असा होता. आम्ही म्हटले, नेपाळची 5 रुपयांची नोट भारतात कशी चालेल ?’ तेव्हा तेथे उपस्थित युवक म्हणाले, या गावात सर्वत्र ही नोट चालते. आम्ही म्हटले, आम्ही या गावातून बाहेर पडल्यानंतर या नेपाळी पाच रुपयांचे मूल्य आमच्यासाठी शून्य आहे. शेवटी त्याची अडचण आणि आमचे कुतूहल म्हणून आम्ही ती नोट आमच्याकडे ठेवून घेतली.
 
वैशिष्ट्यपूर्ण नोट !
 
       या नोटीचे छायाचित्र सोबत दिले आहे. भारतीय रुपयाप्रमाणे त्यावर महात्मा गांधींचे चित्र नाही किंवा कोण्या नेपाळी राजकारणाचे चित्र नाही. या नोटेवर हिमालयाचे चित्र आहे. हिमालय आमची संस्कृती आहे, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.  खरे तर भारताला देखील हिमालयाचा वारसा आहे आणि भारताने तो जगाला सांगण्याची आवश्यकता आहे. असे छोटे छोटे प्रयत्न आपल्याकडच्या विशेष गोष्टींचा प्रसार करत असतात. नेपाळने नोटेवर हिमालयाला दाखवून ते साध्य केले आहे. भारतात असे प्रयत्न कधी होणार ?
      या नोटेची आणखी एक विशेषता म्हणजे तिच्या सर्वांत वर ‘श्री’ असे लिहिले आहे. हिंदु संस्कृतीनुसार कुठल्याही पत्रावर ‘श्री’ लिहिण्याचा प्रघात आहे. ‘श्री’ म्हणजे ऐश्वर्य आणि नोट ही ऐश्वर्याचे प्रतीक आहे. ही नोट पाहून एकच प्रश्न मनात निर्माण झाला की, ‘भारताच्या नोटेवर’श्री’ कधी येणार ?’
 
खुली सीमा !
 
      फुलवरिया गावाच्या शेजारील भारत-नेपाळ सीमेचे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण सीमा खुली आहे. येथे कुठेही सुरक्षारक्षक नाहीत. भारताच्या बाजूने पन्नास मीटर अंतरावर बीएसएफचे जवान होते; पण कोणालाही ये-जा करण्यास अटकाव करत नव्हते. पलीकडे नेपाळच्या सीमेवर कुठलाही जवान नव्हता. आम्ही त्या भूमीवर सर्रास हिंडलो. सीमा खुली असल्याने भारतातले मजूर नेपाळमध्ये जाऊन शेती करतात, तर नेपाळमधले मजूर भारतात येऊन शेती करतात. अनेक भारतीय शेतकऱ्यांच्या जमिनी नेपाळच्या सीमेमध्ये आहेत. ते प्रतिदिन नेपाळमध्ये जाऊन त्यांची शेती करतात.
 
मिश्र संस्कृतीचेे प्रतीक !
 
       नेपाळच्या सीमेलगतचा हा प्रांत मधेशी या नावाने ओळखला जातो. येथे बिहारची संस्कृती आहे. लोकांची भाषा बिहारी आहे आणि संस्कृती बिहारी आहे. चंपारण जिल्ह्यातील बिहारी युवकांचे विवाह नेपाळी अर्थात मधेशी कन्यांशी होतात आणि नेपाळमधील मधेेशी युवक बिहारी कन्यांशी विवाह करतात. 
 
  धर्मप्रसाराच्या कार्यामुळे खरेतर अशी ही मिश्र संस्कृतीचेे प्रतीक असलेेली भारतीय-नेपाळी सीमा पहाण्याचे आम्हास भाग्य लाभले ! असे भाग्य कोणाला लाभते ?

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.
संपर्क : 7775858387