बेंबळा प्रकल्पाचे बॅक वॉटर शिरले येरड येथील शेतकऱ्याच्या शेतात – शेतकरी देशमुख यांचे नुकसान, तत्काळ भरपाईची मागणी

0
840
बेंबळा प्रकल्पाचे बॅक वॉटर शिरले येरड येथील शेतकऱ्याच्या शेतात – शेतकरी देशमुख यांचे नुकसान, तत्काळ भरपाईची मागणी
बेंबळा प्रकल्पाचे बॅक वॉटर शिरले येरड येथील शेतकऱ्याच्या शेतात – शेतकरी देशमुख यांचे नुकसान, तत्काळ भरपाईची मागणी
बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांचा गलथान कारभार
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
   चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथील शेतकऱ्याच्या शेतात बेंबळा प्रकल्पाचे बॅक वॉटर शिरल्याने शेतातील उभे पिके सडण्याच्या मार्गावर असुन शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी केली असुन प्रकल्प अधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याची प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी दिली आहे.
      शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळावी या उद्देशाने शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यात बेंबळा प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जमीन गेली. त्यामुळे शेतकरी आधीच त्रस्त झाले असतांना उरल्या सुरल्या जमिनीतही बेंबळा प्रकल्पाचे बॅक वॉटर शिरत असल्याने शेत पिकाचे नुकसान होत आहे. चांदूर रेल्वेवरून २६ कि. मी. अंतरावर असलेल्या येरड (बाजार) येथील सौ. शौभा भैय्यासाहेब देशमुखे यांची गट क्र. ११७, ११८ व ११९ ही १० एकर शेती बेंबळा प्रकल्पात गेली नसल्याने त्यांनी शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. ऐन सोयाबीन हातात येण्याच्या मार्गावर असतांना बेंबळा प्रकल्पाचे बॅक वॉटर त्यांच्या शेतामध्ये शिरल्याने सोयाबीन पिक पाण्यात गेले. यामध्ये जवळपास एका एकर शेतात पाणी घुसले असुन बॅक वॉटरमुळे शेतात ओलावा कायम आहे.  त्यामुळे या शेतकऱ्याचे हजारो रूपयाचे नुकसान झाले आहे. याशिवाय ओलाव्यामुळे सोयाबीन नंतर पुढील पीक घेणे सुध्दा शक्य नसल्याचे समजते. एका महिण्यापुर्वी घुईखेड येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आढावा बैठकित येरड येथील भुषण देशमुख यांनी बॅक वॉटर शेतात घुसत असल्याची बाब जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, उपजिल्हाधिकारी अजय लहाणे यांच्या लक्षात आणुन दिली होती. यावेळी त्यांनी बॅक वॉटर आता घुसणार नसल्याचे सांगितले होते. मात्र अजुनही पाणी शेतात घुसत असुन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
कार्यकारी अभियंता म्हणतात पाणी जाणे शक्यच नाही
१९ सप्टेंबरला बेंबळा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. भरणे यांनी येरड गावाला भेट देऊन शेताची पाहणी केली होती. व वॉटरलेवल वाढवणार नसुन त्यामुळे पाणी शेतात घुसणार नसल्याचे आश्वासन दिले होते. परंतु शुक्रवारी व शनिवारी सगळीकडे झालेल्या पावसामुळे पुन्हा बॅक वॉटर शेतकऱ्याच्या शेतात घुसले. ही माहिती भुषण भैय्यासाहेब देशमुख यांनी बेंबळा प्रकल्प कार्यकारी अभियंता श्री. भरणे यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी शेतात पाणी जाणे शक्यच नसल्याचे म्हटल्याचे भुषणने सांगितले. पाणी घुसल्यावरही अभियंत्याने असे म्हटल्यामुळे शेतकऱ्यांत तिव्र नाराजी दिसत होती.
२०१६ चा मोबदला अजुनही अप्राप्त
असाच प्रकार ऑक्टोबर २०१६ मध्ये सुध्दा झाला होता. सौ. शोभा देशमुख यांच्यासह येरड येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बॅक वॉटर घुसले होते. पंचनामा झाल्यानंतर नुकसानीचा मोबदला अजुनही मिळालेला नाही. परंतु मोबदल्याची रक्कमेची यादी काही दिवसांपुर्वी आली असुन यामध्ये सौ. शोभा देशमुख यांना सर्वांत कमी रक्कम दर्शविली असल्याचे समजते. मात्र २०१६ मध्ये ज्यांचे नुकसान जास्त झाले त्यांना कमी रक्कम व ज्यांचे नुकसान कमी झाले त्यांना जास्त रक्कम मिळाल्याचा आरोप भुषण देशमुख यांनी केला असुन तत्कालीन पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.