जल्लोष अन आनंदाच्या उधाणाने आकोटात बाप्पांना भावपुर्ण निरोप

0
1532
जल्लोष अन आनंदाच्या उधाणाने आकोटात बाप्पांना भावपुर्ण निरोप
जल्लोष अन आनंदाच्या उधाणाने आकोटात बाप्पांना भावपुर्ण निरोप

आकोट/ संतोष विणके

दहा दिवस घरोघरी तथा सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणरायांना आकोटात भक्तिभावाने आनंद ,उल्हास व जल्लोषात भावपूर्ण निरोप देण्यात आला.शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत एकुण ४० मंडळांनी सहभाग घेतला होता. दुपारी दोन वाजता नरसिंग मंदिर प्रांगणातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य विसर्जन शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ यात्रा चौक येथून शहरातील विविध भागातील गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला .मिरवणुकीत तरुणाईने गुलाबपुष्प व पाकळ्यांची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाचा एकच गजर केला होता.

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुख्य मिरवणुकीत अनेक मंडळं शिस्तबद्धपणे रांगेत लागली होती. मिरवणूक यात्रा चौक, कालंका चौक शनिवारा,केशवराज वेटाळ शौकतअली चौक,जयस्तंभ चौक, सोनू चौक ,या मार्गाने प्रस्थान करून शिवाजी चौकात मिरवणुक संपली. यावेळी मिरवणुकीत विविध वाद्य संगीताच्या तालावर आबालवृद्धांसह तरुणाईने नृत्याचा बेभान ठेका धरला होता.तसेच विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी विविध मार्ग महिला, लहान मुले व नागरिकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते. रात्री दहा वाजता पर्यंत परवानगी असल्याने मंडळ आपल्याआपल्या मार्गावर लवकरच प्रस्थान करताना दिसून आलीत.

विसर्जन मार्गावर ठीकठीकाणी गणरायाचे पुष्पवृष्टी च्या वर्षावात स्वागत होत होते. रात्री साडेदहा वाजता शेवटचे मंडळ शौकत अली चौकातून मार्गस्थ होताच गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठीकठीकाणी भक्तांसाठी पिण्याचे पाणी व इतर सुविधा सामाजिक संस्था व सेवाभावी नागरिकांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

यावेळी संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने स्थानिक सराफा बाजारातील आनंद भोरे यांनी सर्व मंडळाचे व बंदोबस्तावर असणाऱ्या सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे चहापानाने स्वागत केले.

दरम्यान विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर हे स्वतः मिरवणुकीवर जातीने लक्ष ठेवून होते. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्यासह उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार विश्वनाथ घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, नायब तहसीलदार राजेश गुरव,पालिकेचे मुख्याधिकारी नितीन रोड, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, एलसीबी प्रमुख कैलास नागरे,शहर ठाणेदार गजानन शेळके,ग्रामीण ठाणेदार मिलिंद बहाकर,एपिआय फड,पिएसआय आशिष शिंदे शरद गवई ,शहाजी रुपनर,एएसआय रणजीत खेडकर यांच्यासह जिल्हा व उपविभागातील अनेक प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती.

तसेच मिरवणूक शिस्तीत पार पडावी म्हणून मंडळाचे अध्यक्ष ,शांतता समिती सदस्य ,प्रतिष्ठित नागरिक तथा पत्रकारांनी आपले योगदान दिले. संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोट शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पडल्याने प्रशासन व पोलिस खाते व सामान्य जनांनी आनंद व समाधान व्यक्त केले

.