पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत सामावून घ्या  – विभागीय आयुक्तांना दिले निवेदन – शासन निर्णय काढण्याची मागणी

0
8288
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     महाराष्ट्रामध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या 18 हजार 644 असून गेल्या अठरा ते वीस वर्षांपासून शासनाकडे नोकरी मिळणे बाबत पाठपुरावा करीत आहे. शासनाने वय मर्यादा 45 वर्षांपर्यंत दहा टक्के स्पर्धा परीक्षा मध्ये आरक्षण दिले आहे. परंतु आज रोजी अंशकालीन कर्मचारी यांचे वय 50 ते 55 यादरम्यान असल्यामुळे ते दहा टक्के आरक्षणामध्ये बसू शकत नाही. त्यामुळे अंशकालीन पदवीधर कर्मचारी नोकरीपासून वंचित झाले आहे. त्यामुळे शासन निर्णय काढून तत्काळ अंशकालीन कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी अमरावती विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
       पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना शासन सेवेत सामावून घ्यावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून संघटनेमार्फत न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण, धरणे आंदोलन, घंटानाद आंदोलन, भीक मांगो आंदोलन, जेलभरो आंदोलन, आत्मदहन असे विविध प्रकारचे आंदोलनामुळे शासनाने पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा डाटाबेस तयार केला व याबाबत विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 22 मे रोजी एक समिती गठित करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर आहे. निलंगेकर यांनी तीन महिन्यांमध्ये राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी यासाठी शासकीय स्तरावर प्रक्रिया पूर्ण केली असून फक्त शासन निर्णय बाकी आहे. या आश्वासनाला आता सहा महिने होत आहे. याबाबत आजपर्यंत शासनाने कुठलाही ठोस धोरणात्मक निर्णय न घेतल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विभागाच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपोषण करण्यात आले. त्याचबरोबर नागपूर येथे गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून पदवीधर कर्मचारी हे तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी रक्तदान करून संविधान चौक नागपूर येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यामुळे तत्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या या मागणीचे निवेदन पदविधर अंशकालीन कर्मचारी संघटना अमरावती जिल्ह्याच्या विभागीय आयुक्तांना देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पाठविण्याची मागणी केली आहे. यावेळी अनिल वरघट (घुईखेड), रमेश अंभोरे, दिलीप पेठे, योगेश जांभुळकर, सुखदेव कांबळे, माया सहारे, राजश्री मानेकर, प्रिया भगत, रजनी लाहाबर, ज्योती खेसे, अनिता साऊरकर, जयंत नांदुरकर यांसह अनेक पदवीधर अंशकालीन कर्मचारी उपस्थित होते.