गंगारक्षणासाठी आणखी किती बळी ?

0
867
 
गंगानदीला वाचवण्यासाठी २२ जूनपासून आमरण उपोषण करत असलेले ८६ वर्षीय स्वामी ज्ञानस्वरुप सानंद उपाख्य प्रा. जी.डी. अग्रवाल यांचा दुर्दैवी अंत झाला. गंगानदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी लढत असलेल्या स्वामी सानंद यांच्या मृत्युला निष्ठुर, असंवेदनशील, सत्तालोलुप आणि गंगाद्रोही राज्यकर्ते उत्तरदायी आहेत. ‘माँ गंगा ने बुलाया है’ असे म्हणणारे प्रधानसेवक एका ज्येष्ठ पर्यावरणवाद्याच्या आणि गंगाप्रेमीच्या १०९ दिवस चाललेल्या आंदोलनाची, तसेच त्यांनी लिहिलेल्या पत्रांची दखल घेत नाहीत, हे दुर्दैवी आहे. गंगानदीच्या अस्तित्वासाठी झगडणार्‍या एका संतांच्या प्रती राज्यकर्त्यांचा इतका कोडगेपणा असेल, तर अशांचे ‘नमामि गंगे’ म्हणजे ढोंगच म्हणावे लागेल.
 
दुटप्पीपणाचा कहर !
स्वामी सानंद यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य गंगानदीसाठी समर्पित केले होते. विकास प्रकल्पांच्या नावाखाली धरणे बांधून, जलविद्युत प्रकल्प उभारून गंगा नदीचा प्रवाह जो खंडित केला जात आहे, त्याविरोधात स्वामी सानंद यांनी लढा उभारला होता. अतिप्रदूषित झालेली गंगा नदी पुन्हा निर्मळ, पवित्र आणि खळाळती व्हावी, यासाठी त्यांचा संघर्ष होता. वर्ष २०१२ मध्ये गंगेसाठी उपोषणाला बसले असतांना तेव्हाचे मुख्यमंत्री मोदी यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेत ट्वीट केले होते की, ‘अविरल-निर्मल’ गंगेसाठी प्रयत्नरत असणार्‍या स्वामी सानंद यांची प्रकृती चांगली राहो. गंगेला वाचवण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेईल अशी आशा आहे.’ हेच नरेंद्र मोदी जेव्हा २०१४ मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेत आले, तेव्हा गंगानदीसाठी त्यांनी भावनिक भाषणांच्या व्यतिरिक्त भरीव कार्य केले नाही. गंगा मंत्रालय, नमामि गंगे यांसारखे उपक्रम चालू केले, तरी या उपक्रमांच्या फलनिष्पत्तीवर मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. या उपक्रमांच्या अंतर्गत वर्ष २०१९ पर्यंत गंगानदी स्वच्छ करण्याचे ध्येय ठरवण्यात आले होते; पण सध्याला या ध्येयाच्या मार्गावरही आपण नाही. डिसेंबर २०१७ च्या कॅगच्या अहवालानुसार गंगानदीसाठीच्या प्रकल्पांसाठी ७ सहस्र ९९२.३४ कोटी रुपये संमत करण्यात आले होते. २०१४-१५ पासून २०१६-१७ पर्यंत २ सहस्र ६१५ कोटी निधीचा उपयोगच झाला नाही. ७ ऑक्टोबर २०१६ ला राष्ट्रीय गंगा परिषदेची स्थापना करण्यात आली; पण ‘डाऊन टू अर्थ’च्या अहवालानुसार दोन वर्षांत या परिषदेची एकही बैठक झाली नाही. अशा प्रकारांमुळेच स्वामी सानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांची उद्विग्नता व्यक्त केली होती की, मोदी सत्तेत आल्यानंतर गंगानदीसाठी काही तरी प्रयत्न होतील, अशी आशा होती; मात्र गेल्या चार वर्षांत हे दिसून आले की, सरकारच्या योजना गंगानदीला वाचवण्यासाठी कमी आणि केवळ व्यावसायिक लाभाच्या दृष्टीने कार्यान्वित केल्या होत्या. गंगाआरती करणारे, गंगेसाठी जनआंदोलन उभे करण्याचे सांगणारे नरेंद्र मोदी सध्या मात्र गंगानदीविषयी मूग गिळून गप्प आहेत, हा दुटप्पीपणा आहे. 
 
शुद्धीकरणाचा नाही, अस्तित्त्वाचा प्रश्‍न !
 गंगानदीमध्ये प्रतिदिन कोट्यवधी लीटरच्या प्रमाणात औद्योगिक कारखान्यांचे सांडपाणी, मलमूत्र मिसळत आहे. त्यामुळेच जगातील सर्वाधिक प्रदूषित १० नद्यांमध्ये गंगानदीचा क्रमांक आहे. खरे तर नदीचा प्रवाहच नदीला शुद्ध ठेवतो. नदीला शुद्ध ठेवायचे असेल, तर नदीला तिच्या नैसर्गिक वेगानुसार वहाते ठेवणे आवश्यक आहे; मात्र गंगा नदीचा प्रवाह ठिकठिकाणी बांध बांधून, धरणे बांधून, जलविद्युत प्रकल्प उभे करून खंडित करण्यात आला आहे. उपनद्यांचे साहाय्य घेऊन गंगा नदी आज कशीबशी प्रयागपर्यंत पोहोचते. प्रयाग येथे गंगेला यमुना ही मोठी नदी मिळत असल्याने ती गंगासागरपर्यंत प्रवास करू शकते. देवनदी गंगेमध्ये कुणी आचमन करू शकत नाही कि स्नान करू शकत नाही, अशी स्थिती आहे. गंगेचा प्रवाह नष्ट करणारे अवैध उत्खननकार्य गेली अनेक वर्षे गंगानदीच्या पात्रात चालू आहे. हरिद्वार येथे गंगेच्या पात्रातील दगडांची खडी करण्याचा आणि वाळू उपसण्याचा व्यापार चालू आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या कथित विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणाची न भरून निघणारी हानी झाल्याचा अहवाल दिला आहे. हे असेच चालू राहिले, तर सरस्वतीप्रमाणे गंगानदीही भविष्यात लुप्त होईल. आता शुद्धीकरणाचा प्रश्‍न राहिला नसून, गंगानदीच्या अस्तित्त्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
 
भ्रष्ट व्यवस्थेत पाणी मुरत आहे !
गंगानदी ही हिंदूंसाठी केवळ पाण्याचा स्त्रोत नाही, तर देवनदीसह हिंदूंच्या धार्मिक आस्थाही जोडलेल्या आहेत. वर्ष २००८ मध्ये गंगानदीला राष्ट्रीय नदी घोषित करण्यात आले असले, तरी केवळ घोषणा, कागदोपत्री नियम यांना महत्त्व नाही. नद्या प्रदूषित करणे, हा आपल्याकडे फौजदारी स्वरूपाचा अपराध नाही. प्रदूषणकर्त्यांवर कारवाई करतांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकमेकांवर दायित्व ढकलण्याचा भाग होतो. भ्रष्ट आणि अकार्यक्षम व्यवस्थेत पाणी मुरत असल्यानेच गंगामाता आजही अतिप्रदूषित आहे. 
 
गंगारक्षणाची भीष्मप्रतिज्ञा !
 गंगेच्या रक्षणासाठी सनातनने नेहमीच आग्रही प्रयत्न केला आहे. या संदर्भात ‘गंगामाहात्म्य’ आणि ‘देवनदी गंगेचे रक्षण करा’, असे दोन ग्रंथही प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘देवनदी गंगेचे रक्षण करा’ या ग्रंथात पर्यावरणतज्ञ प्रा. जी.डी. अग्रवाल यांच्या गंगारक्षणासाठीच्या कार्याची माहितीही देण्यात आली होती. जी.डी. अग्रवाल यांच्याशी सनातनचा प्रत्यक्ष संपर्क आलेला नसला, तरी त्यांच्या वैचारिक ध्येयाशी सनातन बांधील होते. याआधी स्वामी निगमानंद यांचा गंगारक्षणासाठी आंदोलन करत असतांना उपोषणाच्या वेळी मृत्यू झाला होता. स्वामी सानंद यांच्या बलिदानानंतर लगेचच संत गोपालदास यांनी गंगारक्षणासाठीचे उपोषण चालू ठेवले आहे. त्यामुळे स्वामी सानंद यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, हे निश्‍चित ! स्वामी सानंद यांच्या समर्पणभावातून प्रेरणा घेऊन अनेक गंगापुत्र गंगारक्षणाची भीष्मप्रतिज्ञा करतील. या प्रयत्नांतूनच देवनदी गंगा तिच्या मूळ पवित्र, शुद्ध, खळाळत्या रूपामध्ये पहायला मिळेल. 
श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.