चांदूर रेल्वेच्या सेंट्रल बँकेचा गलथान कारभार – ग्राहकांना तास न् तास उभे राहावे लागते रांगेत

0
786
Google search engine
Google search engine

कर्मचाऱ्यांचा अभाव, पासबुक प्रिंटर बंद, फक्त काऊंटर सुरू

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    देशात बँकेच्या शर्यतीत सेंट्रल बँकेने आपले एक वेगळे अस्तीत्व निर्माण केले आहे. सगळीकडे सेंट्रल बँकेच्या शाखा आहेत. परंतु अशा राष्ट्रीयकृत बँकेच्या चांदूर रेल्वे शहरातील शाखेतील कारभार ढेपाळला आहे. शेकडो ग्राहकांना दररोज तास न् तास रांगेत उभे राहावे लागत असुन एवढ्या मोठ्या बँकेचा कारभार फक्त एका काऊंटरवरच सुरू आहे.  बँकेत पासबुक प्रिंटर बंद, कर्मचाऱ्यांचा अभाव असुन वरिष्ठ अधिकारी याकडे कधी लक्ष देणार असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे.
     चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक नागरिकांचे खाते शहरातील सेंट्रल बँकेत आहे. सुरूवातीला नेहरू शाळेच्या इमारतीत सुरू झालेली बँकेत कमी जागे अभावी गोंधळ निर्माण होत होता. या जुन्या इमारतीत गर्दीमुळे दोन कॅश काऊंटर सुरू होते. मात्र यानंतर आठवडी बाजार परिसरात सेंट्रल बँक नवीन इमारतीत स्थानांतरण करण्यात आली. त्यामुळे नवीन इमारतीत ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळणार असे वाटत होते. परंतु सद्याची स्थिती उलट झाली आहे. नवीन इमारतीत दोन ऐवजी केवळ एक काऊंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे शेकडो ग्राहकांना तास न् तास बँकेत लाईनमध्ये उभे राहावे लागत असुन या दरम्यान अनेकांचे भांडणसुध्दा होत असल्याचे बोलल्या जात आहे. याशिवाय अनेक मोठ्या लोकांना पैसे जमा करण्याकरीता, काढण्याकरीता लाईनमध्ये उभे राहण्याचे काम नसुन त्यांचे डायरेक्ट मागच्या बाजुने काम होत असल्याची चर्चा शहरात आहे. बँकेतील पासबुक प्रिंटर बंद असुन कर्मचारी ग्राहकांना उध्दट वागणुक देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बँकेत कर्मचाऱ्यांचा अभाव असुन वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर बँकेचे व्यवस्थापक बऱ्याच दिवसापासुन रजेवर असुन बँकेचा कारभार वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

सेंट्रल बँकेचे एटीएम गायब

एकीकडे सेंट्रल बँकेचा असा गलथान कारभार असतांना दुसरीकडे याच बँकेचे एटीएम शहरातुन गायब झाले आहे. एटीएम ची मागणी वाढत असतांना मात्र सेंट्रल बँकेने आपले एटीएम बंद केले आहे. एटीएम पुन्हा सुरू होणार की नाही ? याबाबत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही.