दुचाकीने जाणाऱ्यांनो सावधान, – मालखेड, भानखेड परीसरात पट्टेदार वाघ-शेतकऱ्याला, शहरवासीयांना झाले दर्शन -गावकऱ्यांत भितीचे वातावरण

0
3119
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)

    ८१ वेळा दात व पंजाने मारा करून धामणगाव रेल्वे तालुक्यातील एका शेतकऱ्याला ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाने दुसऱ्या दिवशी म्हशीची सुध्दा शिकार केली. अनेक गावे रात्रीला या नरभक्षक वाघाच्या दहशतीत असतांना आता चांदूर रेल्वे तालुक्यात सुध्दा दुसऱ्या वाघाची दहशत निर्माण झाली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड, भानखेड परिसरात सोमवारी एका पट्टेदार वाघाचे अनेकांना दर्शन झाले असुन गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     प्राप्तमाहितीनुसार तालुक्यातील मालखेड रेल्वे येथील शेतकरी पुंडलीकराव सुने हे सोमवारी सकाळी ९.४५ वाजता शेतात गेले असता त्यांना शेतातुन एक पट्टेदार वाघ जातांना दिसला. सदर पट्टेदार वाघ मालखेड परिसरात भ्रमण करीत असतांना सायंकाळी ५.३५ वाजता चांदूर रेल्वेवरून पोहरा, भानखेडमार्गे अमरावती येथे एका कार्यक्रमासाठी जात असतांना चांदूर रेल्वे शहरातील विनय कडु व स्वप्निल मानकर यांना भानखेड येथे या वाघाचे दर्शन झाले. वाघ अचानक कारसमोर आल्याने त्यांना जोरदार ब्रेक मारावा लागला. पट्टेदार वाघ त्यांनी केवळ १० ते १५ फुटांवरूनच बघितल्याचे आमच्या प्रतिनीधीशी बोलतांना सांगितले. त्यानंतर या वाघाने भानखेड येथील मातोश्री वृध्दाश्रमाकडे प्रस्थान केल्याचे सांगितले. त्यांनी वाघ असल्याचे गावातील लोकांना, रस्त्याने जाणाऱ्यांना सांगुन सावध राहण्याचा इशारा सुध्दा दिला. त्यामुळे या परिसरातील नागरीक भयभीत झाले असुन शेतकरी, शेतमजुर वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे. पहिलेच धामणगांव रेल्वे तालुक्यात वाघाची मोठी दहशत असतांना तिच दहशत चांदूर रेल्वे तालुक्यातील काही भागांत सुध्दा होती. परंतु यासोबत आता या दुसऱ्या पट्टेदार वाघाच्या दर्शनाने चांदूर रेल्वे तालुक्यातील नागरीकांच्या भितीमध्ये अजुन भर पडली आहे. अशामुळे आता दुचाकीने प्रवास करणाऱ्यांना सावध राहणे गरजेचे आहे. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करून नागरीकांना भयमुक्त करावे अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे. याबाबत वनविभागाकडुन अधिक माहिती मिळू शकली नाही.