दिवाळी आली, तरी बाजारात शुकशुकाट <> चांदूर रेल्वे शहरातील बाजारपेठांवर मंदिचे सावट – दुष्काळ, महागाईने ग्राहकांनी फिरवली पाठ

0
855
Google search engine
Google search engine

(फोटो – शहेजाद खान) 

चांदूर रेल्वे –

      दिवाळी म्हणजे भरपूर खरेदी, हे दरवर्षीचे चित्र यंदा पालटले आहे. गेल्या वर्षी जीएसटीमुळे वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या त्याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला होता. तर यंदा पावसाने दगा दिल्याने ग्रामीण भागाचे कबरंडेच मोडले आहे. दरम्यान, दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर आली असली तरी चांदूर रेल्वे शहरातील बाजारात शुकशुकाट असल्याने बाजारावर मंदिचे सावट पसरले असल्याचे दिसत आहे.

         दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमिवर दिवाळी साजरी करण्याकरीता घरोघरी व बाजार पेठेत दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठेत दुकानदारांनी ग्राहकांच्या पसंतीने व आवडीनुसार मागणीनुसार, विविध प्रकारच्या वस्तुंनी दुकाने थाटली आहेत. लक्ष्मी पुजनासाठी लागणारी केरसुणी, विविध रंगाचे व आकाराचे आकाश कंदील, असंख्य डिजाईनच्या पणत्या, रांगोळीचे अनेक रंग, रेडीमेड फराळ, किराणा साहित्यासह कपडे, फटाके, आकाशदिवे, भेटवस्तू यांची दुकाने थाटली आहेत. नुसती दुकाने सजली मात्र, ग्राहक पणत्या सोडून दुसरे खरेदी करताना दिसत नाही.

१)

ऑनलाईनकडे कल 

       आकर्षक आकाशकंदील असो वा रंगीबेरंगी दिवे. सजावटीसाठी झिरमिळ्या असो वा विद्युत रोषणाईचे दिवे. कपडे, मोबाईल, टीव्ही आदी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू आदी सगळे ऑनलाइन मिळत आहे. याच ट्रेंडमुळे बाजारापेठांसोबतच ऑनलाइन खरेदीलाही बहर आला आहे. घरबसल्या कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत अशा कित्येक वस्तूंच्या खरेदीच्या ऑर्डर दिल्या जात आहेत. ऑनलाईन शॉपिंगवर खास ऑफर्सही मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा कलही ऑनलाइन शॉपिंगकडेही वाढला आहे.

२)

यंदा आनंदावर विरजण पडणार 

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी फटाक्‍यांचे दर स्थिर आहेत. असे असले तरी देखील सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याकरीता केवळ दोनच तासांचा अवधी दिला असल्याने यंदा आनंदावर विरजण पडणार असल्याचेही बाजारात गर्दी नसल्याने बोलले जात आहे.

३)

वस्तुंचे दर वाढले

दिवाळी सण महागाईच्या तडाख्यात सापडला आहे. फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या डाळी, रवा, मैदा व कपडे, पणत्या आकाश कंदिल यासह सर्व वस्तूंचे दर तब्बल २० टक्‍क्‍यांपेक्षा दराने वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे दिवाळे निघणार आहे.