पालकमंत्र्यांकडून शहरात स्वच्छता कामांची पाहणी >< बाजार व गर्दीच्या ठिकाणी प्रभावीपणे स्वच्छता मोहिम राबवा : -पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील

0
917

शहरातील विविध बाजार, गर्दीची व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता काटेकोर असली पाहिजे. अस्वच्छतेबाबत स्थानिक नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करुन निविदा प्रक्रिया राबवावी व स्वच्छतेच्या कामांत सातत्य ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज दिले.
पालकमंत्र्यांनी स्थानिक नगरसेवकांसह आज शहरात स्वच्छता कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे, पालिकेच्या आरोग्याधिकारी श्रीमती नैताम, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी श्री. कुत्तरमारे, स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता पाहणी दौऱ्यात प्रारंभी शंकरनगर परिसर, फरशी स्टॉप परिसर, गौरक्षणाच्या बाजूचा दस्तुरनगर परिसर, शिवधारा नेत्रालय, जयभारतनगर चपराशीपुरा परिसर, बेलपुरा, रेल्वेस्टेशन, जुना कॉटन मार्केट रोड आदी परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भाजी बाजार व इतवारा बाजारातील भागांची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

श्री. पोटे पाटील म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. भाजीबाजार, इतवारा बाजारातील भाजीविक्रेत्या व दुकानदारांना कायमस्वरुपी सिमेंट-काँक्रिटचे ओटे बांधून द्यावे. परिसरात सांडपाण्याची सुरळीत व्यवस्था होण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करावे. सडक्या भाजीपाल्याची दुर्गंधी व मोकाट गुराढोरांचा वावर रोखण्यासाठी जागोजागी कंटेनर ठेवावे आणि त्याची नित्याने साफसफाई करावी. नागरिकांना येणे-जाणे सोयीचे व्हावे यासाठी भाजीपाला विक्रेता व दुकानदारांना साहित्य आपल्या जागेतच ठेवण्यास सूचित करावे. परिसरात स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे आदेश त्यांनी दिले.

स्वच्छतेच्या ठेक्यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. स्वच्छतेच्या ठेक्यांची प्रक्रिया नव्याने राबवून तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असेही त्यांनी मनपा प्रशासनाला आदेश दिले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक, भाजीपाला विक्रेते, दुकानदार उपस्थित होते.