शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त गडकिल्ले सजावट व रांगोळी स्पर्धा

0
652
Google search engine
Google search engine

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त गडकिल्ले सजावट व रांगोळी स्पर्धा

वाडा, दि. १८: हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाडा शहर शाखा व शिवसेनेचे कार्यकर्ते नरेश चौधरी आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका तथा पाणी पुरवठा सभापती नयना चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने गडकिल्ले सजावट व भव्य रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण शनिवार दिनांक १७ रोजी करण्यात आले.
तमाम हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व इतिहास नव्या पिढीपुढे पुन्हा जागृत व्हावा व गडकिल्ल्यांचे संवर्धन होण्यास प्रेरणा मिळावी या उद्देशाने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून गडकिल्ले सजावट स्पर्धा व भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गडकिल्ले सजावट स्पर्धेत सुमारे ४० स्पर्धकांनी भाग घेतला तर रांगोळी स्पर्धेत २५ स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रसिका कराळे यांनी तर द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे गायत्री तरे आणि आकांक्षा डोहाळे यांनी पटकावले तसेच गडकिल्ले सजावटीसाठी प्रथम पारितोषिक अभिषेक जनार्दन शेलार याने तर द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे सूचित प्रशांत गंधे व रिध्दी राहुल काळण यांनी पटकावले. इतर सर्व स्पर्धकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले तर विजयी स्पर्धकांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. दरम्यान स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम पाहिलेले संतोष डेंगाणे, कुलदीप दिवटे, प्रमोद ओरपे, अर्चना वाडेकर व समिता मोरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभास शिवसेनेचे माजी उपजिल्हा अरुण पाटील, उपतालुका प्रमुख तुषार यादव, कैलास सोनटक्के, शहर प्रमुख प्रकाश केणे, उपनगराध्यक्षा उर्मिला पाटील, गटनेते संदीप गणोरे, पाणीपुरवठा सभापती नयना चौधरी, नगरसेविका जागृती काळण, श्याम ठाकरे, पत्रकार युवराज ठाकरे, गजानन कोलेकर, चंद्रकांत मलबारी, राजेंद्र पाटील, निलेश पाटील आदींसह शिवसैनिक, महिला आघाडी कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.