चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर लावले ‘बेशरमचे झाड’ – सत्ताधारी व अपक्ष नगरसेवकांचा पुढाकार

0
648
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चांदूर रेल्वे नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात सत्ताधारी, अपक्ष नगरसेवक यांचे आंदोलन थांबण्याचे नाव घेत नसुन दररोज नवनवीन आंदोलनाचे प्रकार सुरूच आहे. अशातच सोमवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेशरमचे झाड लावुन निषेध नोंदविण्यात आला.
चांदूर रेल्वे नगर परिषदेचे मुख्याधिकारी पाच महिण्यापुर्वी रूजु झाले होते. परंतु अधिकाधिक दिवस ते अनुपस्थित राहत असल्यामुळे जन्म मृत्युची नोंद, घरांचा फेरफार, नळ जोडणी, टॅक्स संबंधी समस्यांसह शहरातील विकासकामे खोळंबली आहे. जिल्हाधिकारी यांनी नवीन घरकुलाचे काम तातडीने करण्याचे आदेश दिले असतांना मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजरीमुळे शहरातील घरकुलाचे कामे थंडबस्त्यात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. या मनमानी कारभाराला वैतागुन सत्ताधारी व अपक्ष नगरसेवक तसेच नागरीकांनी मिळून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर सोमवारी बेशरमचे झाड लावुन आपला निषेध व्यक्त केला. यापुर्वी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या शाब्दीक खडाजंगी झाली होती. यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन, न. प. आवारात किर्तन सुध्दा केले. यानंतर आता बेशरमचे झाड लावुन निषेध व्यक्त केला. परंतु असा प्रकार अजुन किती दिवस चालणार असा सवाल शहरवासी विचारत आहे.
यावेळी नगरसेवक बच्चु वानरे, प्रफुल्ल कोकाटे, महेश कलावटे, गोटु गायकवाड, बंटी माकोडे, सतपाल वरठे यांसह अनेक शहरवासी उपस्थित होते.