हिंदूंच्याच धार्मिक भावनांशी खेळ !

0
824
Google search engine
Google search engine
 ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ या पवित्र स्थानी प्रेमाचे चाळे दाखवून धार्मिक स्थानाची विटंबना करण्यात आली आहे. सधन कुटुंबातील हिंदु युवती आणि घोडेवाल्याचे काम करणारा मुसलमान युवक यांच्यातील प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने केदारनाथ येथे जलप्रलय आल्याचा जावईशोध या चित्रपटात लावण्यात आल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरवरून दिसून येते. हिंदूबहुल भारतात चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मस्थानी ‘लव्ह जिहाद’ची घटना दाखवण्यातूनच हिंदूंच्या धार्मिक भावनांना काय किंमत दिली जाते, हे दिसून येते. मक्का किंवा मदिना येथे हिंदू युवक आणि मुसलमान युवती यांच्या प्रेमाचे प्रकरण दाखवण्याची निर्मात्यांची हिंमत झाली असती का ? दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा या चित्रपटामागचा हेतूच अशुद्ध असून जोपर्यंत धर्म आणि राष्ट्र यांवरचे आघात रोखण्यासाठी हिंदूंचा दबावगट निर्माण होणार नाही, तोपर्यंत धर्मावरील आघातांना चाप बसणार नाही.
 
दूषित दृष्टी !
            मंदाकिनी नदीला महापूर येऊन केदारनाथला वर्ष २०१३ मध्ये जो जलप्रलय झाला, त्यामागची कारणे आणि या जलप्रलयातूनही टिकून राहिलेले केदारनाथ मंदिराचे अस्तित्व, तसेच भगवान शंकरांनी विविध माध्यमांतून दिलेल्या अनुभूती यांसारख्या कितीतरी गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून दाखवल्या जाऊ शकल्या असत्या; पण त्यासाठी तशी जिज्ञासू आणि निर्मळ दृष्टी हवी. देवाला शोधण्याची आणि त्याचे अस्तित्व अनुभवण्याची तळमळ हवी; पण जिथे दृष्टीच हिंदु धर्मद्वेषाची आणि पूर्वग्रहदूषित असेल, तिथे केदारनाथ यात्रेला ‘प्रेमाची यात्रा’ म्हणण्याची कुबुद्धी होणारच ! डोंगरदर्‍यांतून खडतर प्रवास करून भाविक केदारनाथला जातात, ते वासनेच्या लौकिक प्रेमापोटी नाही, तर भगवंतावर असणार्‍या पारलौकिक प्रेमापोटी ! पण पैशांच्या बळावर हिंदूंना हिणवण्याचा एककलमी कार्यक्रम राबवणार्‍यांना आणि धर्मशिक्षणाच्या अभावी धार्मिक संवेदना बोथट झालेल्यांना हे कळणार कुठून ! केदारनाथ येथे झालेल्या जलप्रलयाच्या वेळी जवळपास ४ सहस्र जणांचा मृत्यू झाला होता. नदीच्या मार्गात येणार्‍या सर्व इमारती, वाहने, झाडे प्रवाहाने उखडून टाकले होते; पण या महाभयंकर आपत्तीमध्ये १ सहस्रहून अधिक वर्षे जुने असलेले केदारनाथ येथील भोलेनाथांचे मंदिर पूर्णतः सुरक्षित होते. मंदिराच्या समोरील छोटासा नंदीही आहे तसाच होता. मंदिराच्या मागे आलेल्या एका मोठ्या शिळेमुळे पाण्याचा प्रवाह विभाजित होऊन मंदिर सुरक्षित राहिले होते. या शिळेच्या रुपात भगवान शंकरच प्रकट झाले, अशी भावना भाविकांमध्ये आहे. आजही त्या शिळेचे पूजन केले जाते. चित्रपट, तसेच डॉक्युमेंटरी होऊ शकतील, अशा कितीतरी अगम्य गोष्टी केदारनाथ स्थानाशी जोडलेल्या आहेत; पण दिग्दर्शकाने चित्रपटात दाखवले भलतेच ! चित्रपटातील हिंदु युवतीच्या मुसलमान युवकाशी असलेल्या प्रेमप्रकरणाला विरोध करतांना अभिनेत्रीचे वडील ‘हा संगम मी होऊ देणार नाही, भले प्रलय का येईना’, असे म्हणतात. त्यावर अभिनेत्री ‘मग हा प्रलय येण्यासाठी मी जप करीन’ असे वाक्य म्हणतांना दाखवले आहे. म्हणजे देवाची भक्ती तर दूरच; पण प्रेमापोटी समाजाचा हाहाःकार उडाला, तरी काही हरकत नाही, अशी विकृत शिकवण देण्याचा या प्रसंगातून प्रयत्न केला आहे. 
 
बॉलीवूड : ‘लव्ह जिहाद’चे केंद्र !
 केवळ चित्रपटामध्ये नाही, तर बॉलीवूडमध्ये प्रत्यक्षातही ‘लव्ह जिहाद’च्या कित्येक घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध खानांपासून ते नवोदित कलाकारांपर्यंत हे लोण पसरले आहे; किंबहुना हिंदु धर्मावर घाला घालण्यासाठी ते पसरवले गेले आहे, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. ‘प्रेमाला धर्म आणि जात यांचे बंधन नसते’ असा कितीही कंठशोष केला, तरी हिंदू युवतींना शिकार बनवणारे ‘लव्ह जिहाद’ हे वास्तव आहे. केरळ उच्च न्यायालयानेही त्याची नोंद घेतली होती. एका गंभीर समस्येला वाचा फोडण्याच्या ऐवजी प्रेमाचा मुलामा देऊन त्याला प्रोत्साहन देणे हे षड्यंत्रच आहे.
 स्थानिक हिंदू, तसेच पुजारी यांनी या ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करूनही त्याची नोंद घेण्यात आली नाही. या चित्रपटावर मग बंदी घालण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदूंच्या धर्मश्रद्धांच्या बाजूने निर्णय होणार कि ‘शबरीमला’प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंची दडपशाहीच चालू रहाणार, हे लवकरच स्पष्ट होईल. याआधीही ‘लव्हरात्री’, ‘पीके’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव-मस्तानी’, ‘ओह माय गॉड’, ‘माय नेम इज खान’, ‘रामलीला’ आदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूंच्या देवता, संत यांची खिल्ली उडवण्यात आली होती. याउलट अन्य पंथियांच्या भावना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्यात आल्या होत्या. विश्‍वरुपम् या चित्रपटात मुसलमानांच्या भावना दुखावू शकतात; म्हणून तामिळनाडू सरकारने त्यावर बंदी घातली होती. ख्रिश्‍चनांच्या धार्मिक भावनांची काळजी घेण्यासाठी गोवा सरकारने ‘द दा विन्सी कोड’ या चित्रपटावर बंदी घातली होती. ‘कमाल धमाल मालामाल’ या चित्रपटात ख्रिस्ती पाद्री एका कुत्र्याचे लग्न आयोजित करण्यात दाखवले असल्याने हा चित्रपट मागे घेऊन याचे पुन्हा ‘सेन्सॉरिंग’ करण्यात आले. अक्षय कुमार यांच्या ‘एन्टरटेन्मेंट’ या चित्रपटात ‘अब्दुल्ला’ नावाचे विनोदी पात्र दाखवण्यात आल्याने केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाने मुसलमानांच्या भावना दुखावू नयेत; म्हणून अब्दुल्ला हे नाव पालटण्यास सांगितले होते. मग हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या चित्रपटांना ‘सेन्सॉर मंडळा’कडून कात्री का लावली जात नाही ? त्यामागेही काही ‘अर्थ’ असू शकतो का ? त्यामुळेच हिंदूंची मंदिरे, धार्मिक श्रद्धा यांचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण होऊ नये; म्हणून केंद्रीय परीनिरिक्षण मंडळाने नियमावली बनवण्याची आवश्यकता आहे. 
 भगवान शंकर ही लयाची देवता आहे. त्याची आराधना करून हिंदूंनीच संघटित होऊन अशा चित्रपटांवर आणि त्याही पुढे जाऊन कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर कायमस्वरुपी बहिष्कार घालून धर्मद्वेषाच्या विषवल्लीचा लय करण्याचा संकल्प करायला हवा.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.