कठोरा नाका ते चांदूर बाजार रस्ता भूमिपूजन >< रस्तेविकास व पायाभूत सुविधानिर्मितीत अमरावती जिल्हा अग्रेसर -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

0
861

अमरावती-: भरभक्कम पायाभूत सुविधांतून विकासाला गती देण्यासाठी राज्यभर रस्तेविकास, सिंचन प्रकल्प असे मोठे निर्माणकार्य होत आहे. या विकासकामांत अमरावती जिल्हा अग्रेसर असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.

हायब्रीड ॲन्युईटी प्रकल्पांतर्गत अमरावती कठोरा चांदूर बाजार रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन श्री. पोटे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार श्रीकांत देशपांडे, उपमहापौर संध्याताई टिकले, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष विवेक कलोती, भाजपचे महानगराध्यक्ष जयंत डेहणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक साळवे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकहिताचे निर्णय घेत सिंचन, रस्तेविकास, आरोग्य सुविधा आदी कामांना गती देत राज्यात विकासाचा झंझावात आणला आहे. राज्यात हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत सुमारे 30 हजार कोटी रुपयांच्या निधीतून 10 हजार किलोमीटर रस्ते निर्माण होत आहेत. एकट्या अमरावती जिल्ह्यात 1600 किमी लांबीचे विविध रस्ते निर्माण होत आहेत. रस्ते व पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्राकडून मोठा निधी मिळवून दिला आहे.

सिंचनाबाबतीत प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. देशमुख यांच्या प्रयत्नामुळे 1800 कोटी रूपयांचा निधी जिल्ह्यात आला आहे. सर्वांच्या साथीने विकासाचा हा प्रवाह आणखी पुढे जाणार आहे,असेही यावेळी श्री. पोटे पाटील म्हणाले.

डॉ. देशमुख म्हणाले की, रस्त्यांच्या बाबतीत जिल्ह्याचा असलेला अनुशेष पालकमंत्री श्री. पोटे यांनी केलेल्या ठोस प्रयत्नामुळे भरून निघाला आहे. जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. कठोरा ते चांदूर बाजार रस्त्याच्या विकासामुळे या परिसरातील नागरिकांसाठी चांगली सोय निर्माण होणार आहे.

खासदार श्री. अडसूळ म्हणाले की, प्रभावी दळणवळणासाठी राज्यभर प्रचंड प्रमाणावर कामे सुरु आहेत. त्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत कंत्राटदाराकडून रस्तेनिर्मितीनंतर दहा वर्षे देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे, असे श्री. साळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले.