धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगाभरती रद्द करा – श्री गोपीचंद पडळकर

0
833
Google search engine
Google search engine
पुणे / मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे (एसटीचे) आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने ‘मेगाभरती’ रद्द करावी. तसेच मध्यप्रदेश सरकारने ज्याप्रमाणे गोंड, गोवारी समाजाला परिपत्रक काढत आरक्षण दिले त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करावे, अशी मागणी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाच्या वतीने मोर्चे आंदोलने मेळावे सुरु आहेत. ‘धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा’ या अंतर्गत धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जाणकर यांनी राज्यभरात ‘एल्गार मेळावे’ घेत आरक्षणाचा लढा उभारला आहे. आतापर्यंत पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेशमध्ये मेळावे घेत गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. दरम्यान, सरकार याप्रश्‍नी चालढकल करत असल्याने आंदोलनाचा पुढील टप्प्यावर राज्यभरातील धनगर समाज सरकारच्या निषेधार्त बुधवार पासून घरावर काळे झेंडे लावत सरकारचा निषेध करणार आहे. राज्यातील धनगर समाजाने 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी यावेळी समाजाला केले. पडळकर म्हणाले, सरकार आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी. समाजात सरकार विरोधात तीव्र भावना आहेत. जर सरकारने धनगर समाजाला आरक्षण न देता मेगा भरती राबविल्यास सरकारला याचे गंभीर परीणाम भोगावे लागतील. सरकारने त्वरीत आरक्षण दिले नाही, तर यापुढील काळात आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशाराही पडळकर यांनी यावेळी दिला.