दुष्काळग्रस्तांना राष्ट्रवादीचा चला देऊया मदतीचा हात संकल्पना – आ. जयंतराव पाटील

0
756
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची पवारसाहेबांची इच्छा आहे. दुष्काळी भागात जिथे सरकारी मदत पोहोचत नाही तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोहोचावे. शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा आणि चला देऊ मदतीचा हात ही संकल्पना पुढे न्यावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले. 12 डिसेंबर रोजी शरद पवारसाहेबांचा 78 वा वाढदिवस आहे. सर्वांचे विविध कार्यक्रम असतील त्यामुळे हा कार्यक्रम घेत आहोत असेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.
शरद पवारसाहेबांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी विविध योजनाही केल्या. त्यामुळे पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांनीही तळागाळाच्या माणसापर्यंत पोहोचायला हवे आणि बुथ कमिटयांच्या माध्यमातून पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावा असेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. आजच्या पाच राज्यांच्या निवडणुक निकालामुळे स्पष्ट होते की, येत्या काळात राज्यात सत्तांतर होणार आहे परंतु ही लढाई फक्त निवडणुकीपुरती नाही तर लोकांचे प्रश्र सुटायला हवेत अशी आपली भूमिका पाहिजे असेही कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले. नेत्यांच्या पाठी फिरले म्हणजे पक्षाचे काम झाले असे नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. राष्ट्रवादी कनेक्ट या अपद्वारे आतापर्यंत 2 लाख 30 कार्यकर्त्यांची नोंद झाली आहे. ही संख्या येत्या काळात वाढली पाहिजे. 5 लाख कार्यकर्ते पुढच्या काळात नोंद होतील असा आमचा अंदाज आहे असेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेवलवर काम करावे. भाजप शिवसेना सरकारचा चुकीचा कारभार जनतेसमोर मांडावा असा कानमंत्रही आमदार जयंत पाटील यांनी यावेळी दिला. येत्या काळात 25 डिसेंबरपासून 15 दिवस सरकार विरोधात प्रत्येक प्रश्नांवर तालुका पातळीपासून गाव पातळीवर आंदोलन करा असे आवाहनही आमदार जयंतराव पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसेपाटील,राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विदया चव्हाण, आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, माध्यम विभागाचे प्रमुख संजय घोडके, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.विक्रम काळे, आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आदींसह पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.