‘आप” युवा आघाडीतर्फे पुण्यात ‘मेगाभरतीसाठी महाआरती’ आंदोलन

0
1571
Google search engine
Google search engine

पुणे :-

मेगाभरतीची प्रक्रिया जलद करण्यासाठी व युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्याकरिता देवेंद्र फडणवीस सरकारने लवकर हालचाली कराव्यात या मागणी करिता ‘मेगाभरती साठी महाआरती’ या नावाखाली आम आदमी पार्टी युवा आघाडीने आज बालगंधर्व चौकात मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची प्रतिकात्मक महाआरती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला गाजराचा हार घालून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

‘आप’ युवा आघाडी सातत्याने युवकांच्या रोजगाराप्रश्नी आवाज उठवत आहे. सरकारने 72 हजार जागांची मेगाभरती जाहीर केली. मराठा आरक्षणासंबंधित याचिकेवर सुनावणी करताना माननीय न्यायालयाने 23 जानेवारी पर्यंत मेगाभरती मधील नियुक्ती पत्रे देऊ नयेत असा आदेश दिला आहे. 23 जानेवारी नंतर देखील नियुक्ती होईल का याबाबतची शंका स्पर्धा परीक्षार्थींकडुन उपस्थित केली जात आहे.

‘मेगाभरती संबंधी न्यायालयाच्या निर्णयाचे कारण पुढे करून सरकार ही प्रक्रिया अजून पुढे ढकलेल आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भरतीचे आश्वासन देऊन त्याचा वापर करेल. 16% कोट्यातील नोकऱ्या वादाचा प्रश्न राहतील किंवा परीक्षा देऊन नियुक्त्याच नाहीत अशी अवस्था युवक-युवतींची होणार आहे. BMC आणि CIDCO च्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यावरून सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसून येतं. मेगाभरतीचे मोठं गाजर या सरकारने दिलं आहे आणि त्यामुळेच आम्ही आज त्याच गाजराचा हार मा. मुख्यमंत्रांच्या पोस्टरला घालून याठिकाणी निषध व्यक्त केला आहे’ अशी प्रतिक्रिया ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी दिली.

शासनाने आचारसंहिता लागण्यापूरवी मेगाभरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा व लाखो युवकांच्या मनातला संभ्रम दूर करावा अशी मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली.

या आंदोलनात आम आदमी पार्टी पुण्याचे लोकसभा प्रमुख मुकुंद किर्दत, शिरूर लोकसभा प्रमुख राजेश चौधरी, मावळ लोकसभा प्रमुख डॉ. अभिजीत मोरे, ‘आप’ युवा आघाडी पुणे जिल्हा संयोजक चेतन बेंद्रे, श्रीकांत आचार्य, प्राजक्ता देशमुख, संदीप सोनावणे, प्रीती गुर्जर, स्वप्नील घिया, सावन राऊत, निखिल खळे, योगेश इंगळे, योगेश कापसे, आशुतोष शिपलकर, ताहेर पटेल, महेश जगताप, अभिजीत गोसावी, उत्तम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.