पालकमंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी घेतला ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्र प्रात्यक्षिक मोहिमेत सहभाग

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा पूर्व तयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने लोकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राबाबत व निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा नियोजन समिती बैठकीपूर्वी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्री व उपस्थित लोकप्रतिनिधींसमोर या यंत्राचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.यावेळी कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिका आयुुक्त रवींद्र खेबुडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन मतदान केले. त्यांनी केलेले मतदान त्याच उमेदवाराला दिलेले आहे, याची खात्री याव्दारे त्यांना झाली.तत्पूर्वी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी याबाबतचा हेतू विषद केला. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्यात येणार आहेत. या अनुषंगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्र ही मतदाराला त्याने केलेल्या मतदानाची पडताळणी दाखविणारी, मतदानाबद्दल विश्वासार्हता निर्माण करणारी यंत्रणा आहे. या बाबतची जनजागृती मोहीम जिल्ह्यात गेली 39 दिवस अत्यंत सूक्ष्मपणे व काटेकोरपणे राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात 2 हजार 405 मतदान केंद्रे आहेत. त्यापेक्षा जास्त 3 हजार 600 ठिकाणी हे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.00000