मा. जिल्हाधिकारी वि. ना. काळम ठरले राज्यस्तरावर उत्कृष्ट जिल्हाधिकारी

सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या व नवनवीन संकल्पना राबवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात येतो. त्यानुसार सन 2017-18 या वर्षासाठी राज्यातील 7 जिल्हाधिकारी यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांची निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने सांगली जिल्ह्यास प्रथमच राज्यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी होण्याचा मान प्रथमच प्राप्त झाला आहे. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.वि. ना. काळम यांची साधारणत: दीड वर्षांपूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कालावधीत त्यांनी सांगली जिल्ह्यात विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले. जलयुक्त शिवार अभियानात राज्यात प्रथम क्रमांक, सात बारा संगणकीकरण, सद्भवना रॅली, बालगाव येथील सूर्यनमस्कार शिबिराचे 5 ठिकाणी विश्वविक्रम, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालयांना आय एस ओ मानांकन अशा अनेक उपक्रमामुळे सांगली जिल्ह्याचे नाव राज्यात नावाजले गेले. तसेच, होप उपक्रम, गोल्डन आवर्स ऍप हे उपक्रम सामान्य नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी उपयुक्त ठरले. केरळ आपदग्रस्तांना मदत, मराठा समाज मुला-मुलींचे वसतिगृह असे त्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेले उपक्रम राज्यात सर्वप्रथम ठरले. त्यांच्या या कामाची दखल घेत नुकतीच त्यांना सचिव पदी पदोन्नतीही मिळाली आहे.सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे या गौरवास पात्र ठरल्याचे सांगत त्यांनी ऋण निर्देश व्यक्त केले आहेत. तसेच, पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि जनता यांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले आहेत.